Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि विशाळगडावर पडझड सुरुच असताना पुरातत्व विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याने आज सेनापती कापशीमध्ये शिवसेनेकडून रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. तसेच दोन्ही ठिकाणच्या अतिक्रमणांविषयीही विभाग मूग गिळून गप्प असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.


पुरातत्व विभागाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ शिवसेना आणि शिवप्रेमींच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनापती कापशी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला होता. 


यावेळी संभाजीराव भोकरे म्हणाले की, आपली अस्मिता असणार्‍या गडकोटांची आज दुरावस्था झाली आहे. पन्हाळा येथील चार दरवाजाजवळील तटबंदी आणि बुरुज ढासळला आहे. येथे अनेक अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तीच अवस्था विशाळगडाची आहे. येथे समाध्या-मंदिरे दुर्लक्षित असून अतिक्रमणांवर पुरातत्व विभाग कोणतीच कारवाई करत नाही. त्यामुळे पुरातत्व विभागाला जाग येण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले.


याप्रसंगी उपतालुकाप्रमुख मारुती पुरीबुवा, विभागप्रमुख अमृत पाटणकर, युवा सेना तालुकाध्यक्ष समीर देसाई, युवासेना जिल्हा समन्वयक जयसिंग टिकले, युवासेना तालुका समन्वयक कुंडलिक शिंदे, युवराज येझर, बबन देसाई, किरण देसाई, प्रकाश पाटील, किरण दळवी, विलास पाटील, राहुल घोरपडे, चंदू सांगले उपस्थित होते.


पन्हाळगडावर दारुपार्टीनंतर संतापाचा कडेलोट


किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी समोर आल्यानंतर राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज या दारुड्यांविरोधात एल्गार करत पन्हाळगडावर एकवटले. गडावरील झुणका भाकर केंद्रांमध्ये काही पर्यटकांनी दारू ढोसल्याचे समोर आल्यानंतर शिवभक्तांच्या संतापाचा कडेलोट झाला. राज्यभरातील शिवभक्तांनी एकत्र येत या सर्व प्रकाराला विरोध करताना तीव्र निषेध व्यक्त केलाच राज्यात होत असलेल्या किल्ल्यांच्या पडझडीवरून झोपी गेलेल्या पुरातत्व विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या