Jayprabha Studio : कोरोना महामारी सुरु असतानाच विकण्यात आलेला कोल्हापुरातील (Kolhapur News) जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सरकारच्या ताब्यात जाणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली परंपरेचा भाग असलेल्या जयप्रभा स्टुडिओवरून सुरु असलेल्या वादावर अखेर पडला आहे. शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी भागीदारीत स्टुडिओ विकत घेतल्यानंतर प्रचंड वाद निर्माण झाला होता. स्टुडिओ बचावासाठी आंदोलने, उपोषणही करण्यात आले. कलाकारांनी सुद्धा आंदोलन करत विरोध केला होता. त्यामुळे प्रदीर्घ लढ्याला यश आले असून स्टुडिओ पुन्हा सरकारकडे जाणार आहे. लता मंगेशकर यांच्याकडून स्टुडिओची विक्री करण्यात आली होती. जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा जागेचा ताबा घेण्याचे कोल्हापूर महापालिकेला आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापूर महापालिकेने खरेदीदारांना पर्यायी जागा द्यावी किंवा स्टुडिओच्या हेरिटेज वास्तू संपादनाच्या बदल्यात उर्वरीत जागेत बांधकामाला परवानगी देऊन टीडीआर द्यावा असे दोन पर्याय शासनाने कोल्हापूर महापालिकेला दिले आहेत. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर एनडी स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर जयप्रभा स्टुडिओचा मुद्दा उपस्थित झाला होता. सरकारने जयप्रभा स्टुडिओ सुद्धा ताब्यात घ्यावा, या मागणीने जोर पकडला होता. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ पुन्हा शासनाच्या ताब्यात आल्याने कोल्हापुरात आनंद व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने नगरविकास विभागाने तीन ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रान्वये या जागेबाबत निर्णय घेण्याचे दोन पर्याय शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेस दिले आहेत. पर्याय एक नुसार कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडीओच्या (बी वॉर्ड मधील सि.स.नं.2814क/1) जागेच्या मोबदल्यात श्री. महालक्ष्मी स्टुडीओ एल.एल.पी.फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन सदर जागा ताब्यात घ्यावी. एक प्रमाणे कार्यवाही शक्य नसल्यास, या जागेतील हेरीटेज जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास परवानगी देवून विकास हस्तांतरणीय हक्क (TDR) उपलब्ध करून देण्यात यावा.
राज्य सरकारकडून झालेल्या निर्णयानंतर राजेश क्षीरसागर यांनी, कलाकार आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या उन्नतीसाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जयप्रभा स्टुडिओच्या जागेबाबत लोकभावनांचा आदर ठेवून खरेदीदार महालक्ष्मी फर्म या कंपनीस पर्यायी जागा स्वीकारून स्टुडीओची जागा सरकारच्या ताब्यात देण्याबाबत आपण सूचना दिल्या होत्या, त्यास संबधित फर्मने सहमती दर्शवित कोल्हापूर महानगरपालिकेस जागा ताब्यात देणेबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या