Kolhapur Railway Station : अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी 43 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेतील देशभरातील कामांचे भूमिपूजन उद्या रविवारी (6 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. मध्य रेल्वेचे पुणे विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ. रामदास भिसे यांनी याबाबत माहिती दिली आहे. विकास केल्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्थानकाची झलक कशी असेल याचे फोटोज खासदार धनंजय महाडिक यांनी शेअर केले आहेत. 


कोणती कामे केली जाणार?


कोल्हापूर रेल्व स्थानकावर 43 कोटी 3 लाखांच्या निधीतून विकासकामे केली जाणार आहेत. त्यामध्ये स्थानकाचे प्रांगण, तिकीट बुकिंग काउंटर, एटीव्हीएम सुविधा, नव्याने तयार केलेल्या कक्षात विद्यमान बुकिंग काउंटर स्थलांतर, प्रवेश लॉबी, मुख्य प्रवेशद्वार आणि द्वितीय प्रवेशद्वारांवर स्वतंत्र कव्हर पार्किंग, रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, रस्ता पृष्ठभाग, पादचारी मार्गाचे नूतनीकरण आदी कामांचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी रेल्वे प्रबंधक विजय कुमार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी उपस्थित होते. अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी गती शक्ती युनिटकडे सोपवली आहे. या योजनेंतर्गत पुणे विभागातील विविध विकासकामांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून, अंमलबजावणीसाठी एजन्सी नेमण्यात येत आहेत. त्यांच्याकडून येत्या वर्षाभरात ही कामे पूर्ण होतील’, असेही डॉ. भिसे यांनी सांगितले.



 


पुणे विभागातील कोणत्या स्थानकांचा विकास होणार?


डॉ. रामदास भिसे म्हणाले की, ‘अमृत भारत विकास योजनेतून पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कराड, सातारा, वाठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरुळी, कडगाव, बारामती आणि फलटण या स्थानकांच्या पुनर्विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पीएम मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भूमिपूजन होईल. पुणे विभागातील कोल्हापूरसह 38 रेल्वे स्थानकांवर कार्यक्रम पाहता येणार आहे.


या कार्यक्रमास खासदार, आमदार, पद्मश्री पुरस्कार विजेते, स्वातंत्र्यसैनिक, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक आणि पोस्ट अधिकारी आणि शालेय मुले, स्वयंसेवी संस्था उपस्थित राहतील. शालेय विद्यार्थ्यांसाठी येथे निबंध आणि चित्रकला स्पर्धा होतील. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमही होईल. यावेळी अमृत ​​भारत स्टेशन योजनेंतर्गत स्टेशनच्या पुनर्विकासाचे नियोजन स्वरूप दर्शविणारा व्हिडिओ दाखवला जाणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या