National Energy Conservation Day : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी (National Energy Conservation Day) आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीतील चार पुरस्कार राज्याला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
विज्ञान भवनात आज ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री क्रीष्ण पाल, सचिव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले, तर काही पुरस्कारांचे वितरण केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या हस्ते झाले.
कोल्हापूरची सौंदर्या पाटील हिला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिस-या क्रमांकाचे पारितोषिक
कोल्हापूरच्या (Kolhapur) हिराराम गर्ल्स हायस्कूलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला. आज राष्ट्रपती यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.
दरम्यान, आज 14 डिसेंबर 2022 रोजी देशभरात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 2022 (National Energy Conservation Day) चे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी लोकांना ऊर्जेचे संरक्षण आणि बचत करण्यासाठी जागरूक केले जाते. दिवस साजरा करण्यासाठी देशभरात परिषदा, चर्चा, कार्यशाळा आणि स्पर्धांसह अनेक उपक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये, लोकांना ऊर्जेच्या चांगल्या वापराचे मार्ग सांगितले जातात. यासोबतच लोकांना ऊर्जेच्या गैरवापराचीही माहिती दिली जाते.
National Energy Conservation Day : काय आहे इतिहास या दिवसाचा?
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत (Union Ministry of Power) स्थापन करण्यात आलेला ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) 1991 पासून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे आयोजन करत आहे. अतिरिक्त ऊर्जा वापर कमी करण्यासाठी BEE धोरणे तयार करण्यात आणि संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात मदत करते. याशिवाय 2001 साली या समितीने "ऊर्जा संवर्धन कायदा" वर स्वाक्षरीही केली आहे.
National Energy Conservation Day : काय आहे महत्व?
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे महत्त्व विशेषत: ऊर्जेचे मूल्य आणि त्याचा कमी वापर करून त्याचे संवर्धन करण्याची गरज याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जातो.
इतर महत्वाच्या बातम्या