Kolhapur News : मराठा समाजातील तरुणांच्या उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी कर्ज मंजुरीसाठी सादर केलेली अधिकाधिक प्रकरणे बँकांनी मंजूर करावीत, महामंडळाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हास्तरावर 'संवाद' मेळावा घ्यावा, अशा सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व बँक व्यवस्थापक यांच्याकडून महामंडळाच्या योजनांचा आढावा घेतला. उद्दिष्टपुर्तीमध्ये चांगले काम करणाऱ्या बँकांच्या व्यवस्थापकांचा सत्कार यावेळी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बैठकीनंतर त्यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देवून कामकाजाची माहिती घेतली.


कर्ज थकविण्याचे प्रमाण अत्यल्प


अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजातील व्यक्ती व उद्योजकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळाकडून योजना राबवण्यात येत आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास लाभार्थ्यांसाठी बँकांकडून व्यवसाय, उद्योगांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते व त्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळाकडून लाभार्थ्यांना परत दिला जातो. लाभार्थ्यांनी कर्जाचे हप्ते वेळेत व पूर्ण पणे जमा केले तरच त्यांना कर्जाचा व्याज परतावा महामंडळाकडून दिला जातो. त्यामुळे कर्ज थकविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याचा विचार करुन बँकांनी जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करुन नवीन उद्योजक उभारण्यासाठी सहकार्य करावे. लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्याचे राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रमाण अत्यंत कमी असून त्या त्या प्रकरणातील त्रुटी दूर करुन घेवून दिलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या.


जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, विविध महामंडळाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय मेळावे घेण्यात आले आहेत. शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी सर्वसमावेशक एकच पोर्टल तयार व्हावे, जेणेकरुन कोणत्याही योजननेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना एकाच पोर्टलवर अर्ज करता येईल. बँकांनी अल्प रक्कमेच्या कर्ज प्रकरणांबाबत संबंधित व्यक्तीला महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.


कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल


यावेळी महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांकडून बँकनिहाय मंजूर प्रकरणे, वितरित कर्ज स्थिती, नाकारलेल्या प्रकरणातील अडचणी आदीबाबींच्या अनुषंगाने माहिती घेतली. तसेच बँक व्यवस्थापकांच्या अडचणी समजावून घेतल्या. याप्रसंगी महामंडळाच्या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ झाला असून त्यामुळे उद्योगाला चालना मिळाल्याची माहिती लाभार्थ्यांनी दिली. तसेच कर्ज प्रकरण मंजूर होताना बँकांकडून येणाऱ्या अडचणींची माहिती उपस्थितांनी दिली. यावर बँकांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. 


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 हजार 529 लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी 7 हजार 780 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले असून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. या लाभार्थ्यांना आतापर्यंत 644 कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यापैकी 6 हजार 797 लाभार्थ्यांना 53 कोटी 40 लाख रुपयांचा व्याज परतावा महामंडळाकडून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. 


तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जिल्ह्यात 59 व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यापैकी 53 प्रकरणांना मंजुरी मिळाली असून 17 कोटी 78 लाख 57 हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यापैकी 51 लाभार्थ्यांना 1 कोटी 7 लाख 49 हजार रुपयांचा व्याज परतावा महामंडळाकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. या योजनेत कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल असल्याची माहिती जिल्हा समन्वयक ऋषिकेश आंग्रे यांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या