Dhananjay Mahadik : कोल्हापूर-मुंबई प्रवास आणखी सुखकर आणि सोयीचा होणार आहे. मुंबई-कोल्हापूर दुसरी विमानसेवा 26 मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली. इंडिगो कंपनीचे विमान सकाळी साडे दहा वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता कोल्हापूर विमानतळावर मुंबईहून येणार आहे, असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "मी खासदार असताना मुंबई आणि बंगळूर या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू झाली. माझ्या पराभवानंतर दोन्ही विमानसेवा बंद झाल्या होत्या. आता राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर मी या दोन्ही विमानसेवांसह अन्य फ्लाईटही सुरू केल्या आहेत.
कोल्हापूरचे वैभव ठरणारा बास्केट ब्रिज उभा राहील
महाडिक यांनी बास्केट ब्रिजवरून विरोधकांना टोला लगावला. ते म्हणाले की, "मी बास्केट ब्रिजची संकल्पना मांडली तेव्हा असे काही अस्तित्वातच नाही, अशी टीका विरोधकांनी केली. मात्र आता या ब्रिजची पायाभरणी होत आहे. शिरोली पूल पाडून हा ब्रिज होईल. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची उंची 12 फुटांनी वाढवली जाणार आहे. त्यापेक्षा जास्त उंचीचा हा ब्रिज असेल. त्यासाठी निधी मंजूर झाला असून वरळी सी लिंक प्रमाणे याचे डिझाईन असेल. हा ब्रिज म्हणजे शहराचे वैभव ठरेल".
पुढील दोन वर्षात कोल्हापूरचे वैभव ठरणारा बास्केट ब्रिज उभा राहील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
गोकुळ चौकशी वादात आता धनंजय महाडिकांची सुद्धा उडी
दुसरीकडे 'गोकुळ'मधील चाचणी लेखापरीक्षणावरून आमदार सतेज पाटील आणि शौमिका महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला असतानाच आता यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनीही वादात उडी घेतली आहे. त्यांनी पहिल्यांदाच सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर जोरदार पलटवार केला. गोकुळवर प्रशासक आणण्यासाठी सतेज पाटलांनी जंग जंग फळ पछाडले होते, अशी टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, "गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये गोकुळमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. तुम्ही सगळं करून बसला. मात्र, तुम्हाला यश आलं नाही. त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. चाचणी लेखापरीक्षणानंतर गोकुळ भ्रष्टाचार बाहेर येईल." दुसरीकडे, सतेज पाटील यांनी चौकशीच्या आदेशानंतर चांगलीच टीका केली होती. त्यांनी म्हटले होते, "की आम्ही ठरवलं असतं, तर गोकुळ आणि राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. मात्र, आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाही". दरम्यान, गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण मंगळवारपासून सुरु होणार आहे. यासाठी गोकुळला आदेशही प्राप्त झाला आहे. त्यामुळे हा वाद अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :