Kolhapur Basket Bridge : कोल्हापूर शहराच्या सौदर्यांत भर घालणारा आणि महापुरात संपर्क तुटू नये म्हणून यासाठी प्रस्तावित असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बास्केट ब्रिजची येत्या 28 जानेवारीला पायाभरणी होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते भूमिपूजन करुन पायाभरणी केली जाणार आहे. या पुलासाठी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरोली येथून शहरात येण्यासाठी बास्केट ब्रिजची सुरुवात होईल. या ब्रिजचे दुसरे टोक जुना शिरोली जकात नाका इथे असणार आहे. ब्रिजची लांबी दीड किलोमीटर आहे. त्यासाठी 150 कोटी निधी प्रस्तावित असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. 


दरम्यान, धनंजय महाडिक राज्यसभेवर गेल्यानंतर पुन्हा बास्केट ब्रिजसाठी पाठपुरावा सुरु केला होता. आता या बास्केट ब्रिजचा (kolhapur basket bridge) आराखडा तयार झाला असून निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, 27 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.30 वाजता कोल्हापुरात नितीन गडकरी यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर ते रात्री 8 वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भेट देऊन कोल्हापूरमध्ये मुक्कामाला असतील. 


28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता विमानतळावरुन हुबळीकडे प्रयाण करतील. हुबळी दौरा पूर्ण केल्यानंतर शिरोळ तालुक्यातील तारदाळमध्ये असतील. शनिवारी सायंकाळी साडे चार वाजता बास्केट ब्रिजची पायाभरणी होईल. पायाभरणी केल्यानंतर त्याठिकाणीच कार्यकर्ता मेळावा होणार आहे. कार्यकर्ता मेळाव्याला गडकरी संबोधित करतील. त्यानंतर भिमा कृषी प्रदर्शनाची पाहणी करुन ते नागपूरकडे प्रयाण करतील.


असा असेल बास्केट ब्रिज!


प्रस्तावित बास्केट ब्रीजमुळे (kolhapur basket bridge) कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराचे सौंदर्य खुलणार आहे. तसेच वाहतूक कोंडीही सुटणार आहे. बास्केट ब्रिजसाठी पंचगंगा नदीपात्रात एकही पिलर नसेल. नदी पात्राच्या बाहेर पिलर टाकले जातील. शिरोली फाट्याकडून येणाऱ्या सर्व्हिस रोडवर हा ब्रिज होईल. बास्केट ब्रिज झाल्यानंतर वाहतूक कोंडी दूर होणार आहे. महापुराच्या काळात महामार्ग आणि आसपासच्या परिसरात पुराचे पाणी पसरल्यामुळे शहराचा संपर्क तुटतो. अशा काळात हा ब्रिज उपयुक्त ठरणार आहे. पुलावरुन वाहतूक सुरु राहिल्याने शहराशी असणारा संपर्क तुटणार नाही.


बास्केट ब्रिजच्या पुलावरुन महाडिकांची कोंडी 


बास्केट ब्रिजची संकल्पना खासदार धनंजय महाडिक यांनी मांडल्यानंतर प्रत्यक्ष कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांना विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर सातत्याने आरोप करण्याय येत होते. त्यामुळे महाडिक यांनी राज्यसभेवर जाताच पाठपुरावा सुरु केला होता. महापुरात कोल्हापूरचा संपर्क तुटल्यानंतर होणारी दुर्दशा पाहता प्रत्यक्ष या बास्केट ब्रिजचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटणार आहेच, पण महामार्गही बंद होणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या