Kalamba Jail : अक्षरशः बदनाम झालेल्या कोल्हापुरातील (Kolhapur Crime) कळंबा जेलमध्येच गुन्ह्यांची मालिकाच सुरू आहे. आज एका भयंकर घटनेत एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यामुळे जेलमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली. सतपालसिंह जोगेंद्रसिंह कोठडा असे मयत कैद्याचे नाव आहे. या घटनेनंतर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मोका कारवाईखाली अटकेत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. भरत घसघसे या कैद्याने आत्महत्या केली होती. त्याने खिडकीला कापडाची पट्टी बांधून आत्महत्या केली होती. जेलमध्येच कैद्यांचे खून, मारामारी, मोबाईल सापडणे, जेल अधिकाऱ्यांवर सहकारी महिलेवर अत्याचाराचे आरोपांमुळे एकंदरीत कळंबा जेलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
गेल्यावर्षीही कैद्याचा मृत्यू
गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात कळंबा जेलमध्ये कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत एका कैद्याचा मृत्यू झाला होता. निशिकांत कांबळेचा मारहाणीत मृत्यू झाला होता. निशिकांत आणि इतर चार कैद्यांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर हाणामारी झाली. याच हाणामारीत बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लग्नाच्या आमिषाने महिला सहकाऱ्यावर अत्याचार
दुसरीकडे, कळंबा जेलमधील महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा जेलच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. योगेश भास्कर पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. पीडिताने जुना राजवाडा पोलिसात धाव घेतल्यानंतर तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने योगेश पाटीलला अटक केली होती.
तत्पूर्वी, कळंबा जेलमध्ये मोक्कातंर्गत शिक्षा भोगत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कैद्यांच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेत मल्लिक ऊर्फ दत्तात्रय रामचंद्र जाधव (रा. सातारा) हा कैदी जखमी झाला होता. सलीम ख्वाजासाहेब शेख, रोहन राजेंद्र जाधव, समाधान राजेंद्र जाधव, प्रतीक संजू जाधव (सर्व रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या कैद्यांची नावे आहेत. ही मारहाण होण्यापूर्वी, कळंबा जेलच्या अधिकाऱ्यांना कैद्यांच्या झाडाझडतीत भिंतीत दुधाच्या पिशवीत लपवलेलं सीम कार्ड आणि बॅटरी नसलेला मोबाईल सापडला होता. कैद्यांकडे मोबाइल, गांजा सापडणे, कैद्यांच्या मारामारी अशा घटनांमुळे कळंबा जेलची नाचक्की होत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :