Deepak Kesarkar on Sanjay Raut : शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांची रावणाशी तुलना करत कडाडून हल्ला चढवलला आहे. रावण दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतो, अशा शब्दात केसरकरांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. कणेरी मठावर होत असलेल्या सुमंगलम लोकोत्सवाच्या शुभारंभासाठी पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापुरात होते. केसरकर म्हणाले की, निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या राऊतांवर कारवाई झाली पाहिजे. सातत्याने बेताल वक्तव्य करत असल्याबद्दल संजय राऊत यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. 


दरम्यान, विधानभवनातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने (Shinde Group) घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विचारले असता म्हणाले की, विधिमंडळ कार्यालय हे कुणाच्या मालकीचं नसतं, तर सरकारचं असतं. उद्धव ठाकरे यांच्या मालकीचं देखील नाही. आम्ही कुणावरही मालकी सांगितली नाही आणि सांगणार नाही. ज्या शरद पवारांजवळ आहेत त्यांच्याकडून तरी काही चांगल्या गोष्टी शिका, कसं बोलावं कसं बोलू नये हे पवारांकडून शिका, असा टोला केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 


भाजप आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला 


दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात बोलताना भाजप आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, फॉर्म्युला ठरला असून कुणाला किती जागा हे वेळ आल्यावर सांगितलं जाईल. अमित शाह यांनी राज्यातील 48 जागांवर विजय हवा असा दावा केल्यानंतर शिंदे गटाला काय मिळणार? याची चर्चा सुरु झाल्याने फडणवीस यांनी खासदार एनडीएमधून निवडून येतील, असं अमित शाह यांनी म्हटल्याचे सांगितले. यावरून संभ्रम करू नका, आम्ही कुणाला शत्रू मानत नाही, वैचारिक विरोधक मानतो. शिवसेनेला मागच्या वेळी मिळायचं तसं योग्य रिप्रेझेन्टेशन मिळेल, असाही दावा फडणवीस यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या