Kolhapur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने (Kolhapur News) छापेमारी करत गोवा बनावटीचा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छापेमारीची कारवाई करून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अनिकेत अरूण पाटील (वय 32, रा. प्लॉट क्र. 32/A, शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि इंद्रजित संताजीराव घोरपडे (वय 45, रा.856 ई वॉर्ड, साईनाथ कॉलनी, लाईन बाजार, कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून शनिवारी (18 फेब्रुवारी) ही कारवाई करण्यात आली. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.


भरारी पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अनिकेत आणि इंद्रजितला ताब्यात घेत कोल्हापुरातील (Kolhapur News) शाहू मिल कॉलनी तसेच पांजरपोळ इंडिस्ट्रिज एरिया या दोन ठिकाणांवर छापेमारी केली. त्यांच्या राहत्या घरात बेकायदा गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठया प्रमाणात साठा सापडला. आरोपींच्या राहत्या घराची कसून तपासणी केली असता सदर घरामध्येमध्येही गोवा राज्य निर्मित उच्च प्रतिच्या विदेशी मद्याने भरलेले 180 व 750 मिलीचे विविध ब्रँडचे 57 बॉक्स इतके मद्य सापडले. निव्वळ मद्याची किंमत 4,93,680 रुपये इतकी आहे. यामध्ये पकडलेल्या आरोपींसह इतर साथीदारांचा सहभाग आहे का? याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. 


सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, निरीक्षक संभाजी बरगे, निरीक्षक अंकुश मते, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, एन. पी. रोटे, बबन पाटील, सचिन लोंढे, जवान सचिन काळेल, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, जय शिनगारे, जयदीप ठमके, योगराज दळवी, श्रीमती सविता देसाई यांनी सहभाग घेतला. 


इतर महत्वाच्या बातम्या