कोल्हापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत शिवरायांच्या मुर्तीला दुग्धाभिषेक करून कोल्हापूरमध्ये दोन जोडप्यांचा विवाह पार पडला. या अनोख्या विवाहसोहळ्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. 
 
कोल्हापुरातील राहुल माने आणि कोमल दिवसे यांनी आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून तसेच त्यांना स्मरण करत नव्या आयुष्याची सुरवात केली. या लग्नाला जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही उपस्थिती लावली. त्यांनी या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत दोघांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 



दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील नव वधू-वराने सुरुवातीला शिवरायांना अभिषेक घातला त्यानंतर आपले लग्नकार्य पूर्ण  केले. अगदी विधिवत पद्धतीने त्यांनी हा विधी पार पाडला. पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे गावातील अभिजित पाटील आणि करवीर तालुक्यातील वाकरे गावातील वैष्णवी पाटील यांच्या या अनोख्या विवाहाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवराज्याभिषेक दिनी सोहळ्यादिवशीच लग्न असल्याने शिवरायांना स्मरून विवाहबंधनात अडकले. 


कोल्हापूर झेडपीमधील कागलकर हाऊसमध्ये ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’


कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कागलकर हाऊसमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej patil) यांच्या हस्ते ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’उभारण्यात आली. शिवराज्यभिषेक हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. शिवरायांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत असून शिव विचारांचे आपण पाईक होऊया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना केले.


‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी : पालकमंत्री सतेज पाटील


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभषेक दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’उभारण्यात येत असून ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य शासनाची वाटचाल सुरु असून शिव विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासनमार्फत यापुढेही अनेक उपक्रम राबविण्यात येतील, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या