Kolhapur Crime : महावितरणच्या इचलकरंजी (Ichalkaranji Crime) ग्रामीण उपविभागातील चंदूर येथील चार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित केल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्याचा प्रकार इचलकरंजीत घडला. या प्रकरणी नंदकुमार लोखंडे, आत्माराम लोखंडेसह तीन जणांविरूद्ध इचलकरंजी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजी विभागात थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी कडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी महावितरणचे थकबाकी वसुली पथक उपविभागीय अभियंता सुनिल अकिवाटे, सहाय्यक अभियंता स्वप्निल कोळी व सहकारी कर्मचाऱ्यांसह चंदूरमध्ये थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी गेले होते.


चंदूर येथील जयश्री गोलगंडे (2 लाक 5 हजार 230 रुपये), शोभा लोखंडे (2 लाख 65 हजार 200 रुपये), गणपती कारंडे (28 हजार 420 रुपये), अमर कारंडे (93 हजार 360 रुपये) या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करण्यात आला. या ग्राहकांना नियमानुसार लेखी पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, वीजपुरवठा खंडित केल्यानंतर तो पूर्ववत केल्याशिवाय वीज खांबावरून उतरु देणार नाही, असा दम भरत नंदकुमार लोखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवीगाळ, धमकी, धक्काबुक्की केली. घटनास्थळावरून पोलिसांनी लोखंडे व सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. हा प्रकार मंगळवारी दुपारी दीड ते अडीचच्या सुमारास चंदूरच्या शाहूनगर गल्ली क्रमांक 1 मध्ये घडला.  


यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार राठी, सहाय्यक पोलिस निरिक्षक भालचंद्र देशमुख यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. चंदूर शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता स्वप्निल कोळी यांच्या फिर्यादीनुसार नंदकुमार लोखंडे, आत्माराम लोखंडे, अर्जुन पाटील, प्रसाद मेटे, योगेश वाघमारे यांच्याविरूध्द शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, धमकी व दमदाटी केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    


इतर महत्वाच्या बातम्या