Chhatrapati Shahu Maharaj Terminus : गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर (Kolhapur News) सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर मुंबईला जाणाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दिल्ली मुख्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत मान्यता मिळताच रेल्वे सुरू होईल त्यासोबत विविध गाड्यांना जादा डबे जोडण्यात येतील, असे आश्वासन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे येथे झालेल्या रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत दिले. कोल्हापूरवरून (Chhatrapati Shahu Maharaj Terminus) सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांना स्लीपर कोच आणि जनरलचे डबे कमी करून एसीचे डबे वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना स्लीपरमधून किंवा जनरलमधून जाण्यासाठी जागा मिळत नसल्याचे चित्र समोर आले होत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती.
एक्स्प्रेस गाड्यांना बोगी वाढणार
दरम्यान, पुढील महिन्यापासून कोल्हापूर निजामुद्दीन, कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेस, कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसला जादा बोगी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा फायदा कोल्हापूरसह सांगली मिरज शहरातील प्रवाशांना होणार आहे. सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेसला तीन जादा बोगी आणि कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेसला तीन जादा बोगी, कोल्हापूर मुंबई कोयना एक्स्प्रेसला तीन जनरल बोगी, कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसला दोन स्लीपर डबे, दोन एसी थ्री टायर बोगी आणि कोल्हापूर नागपूर एक्स्प्रेसला एक जादा बोगी लावण्याचा सदस्यांच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे.
दादर पंढरपूर एक्स्प्रेस या गाडीचा मिरजपर्यंत विस्तार करून मिरज दादर एक्स्प्रेस व्हाया पंढरपूर अशी गाडी लवकर सुरू करण्यात येणार असल्याची बैठकीमध्ये सांगण्यात आले. कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉक्टर स्वप्नील नीला यांच्यासह समिती सदस्य किशोर भोरावत, शिवनाथ बियाणी, अॅड. विनीत पाटील, तानाजी कराळे व बशीर सुतार उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूर, हातकणंगले, मिरज, सांगली, सातारा या स्थानकांचा अमृतभारत योजनेत विकास करण्यात येणार आहे त्यासाठी प्रवाशांकडून 31 मार्चपर्यंत सूचना मागवण्यात आले आहेत. कोल्हापूर ते कलबुर्गी सकाळी नवीन एक्स्प्रेस लवकर सुरू करण्यासाठी निवेदन सदस्यांनी रेल्वे व्यवस्थापनाला दिले.
महत्वाच्या इतर बातम्या :