Chhatrapati Shahu Maharaj Terminus : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातंर्गत येणाऱ्या दौंड ते मनमाड रेल्वे मार्गावर येणाऱ्या बेलापूर-चिखली आणि पुणतांबा रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अन्य गाड्यांचे रेल्वेमार्ग वळविण्यात आले आहेत. दौंड ते मनमाड रेल्वे मार्गावर येणाऱ्या बेलापूर-चिखली आणि पुणतांबा या रेल्वे स्थानकादरम्यान 21 ते 23 मार्च रोजी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 21 मार्च रोजी धावणारी कोल्हापूर- गोंदिया आणि 22 मार्च रोजी धावणारी कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर आणि 23 रोजी धावणारी गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.


21 व 22 रोजी धावणारी हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्सप्रेस मनमाड, इगतपुरी, पनवेल, लोणावळामार्गे धावेल. 21 रोजी धावणारी यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि 22 रोजी धावणारी यशवंतपूर-चंदिगड एक्सप्रेस लोणावळा, पनवेल, कल्याण, मनमाड मार्गे धावणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. 


रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाला वेग 


गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाला वेग आला आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची काही ठिकाणी चाचणी होत आहे, तर काही ठिकाणी तांत्रिक दुरुस्तीचे काम होत आहे. तेवढ्या कालावधीसाठी काही ठराविक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येतात. त्यानुसार महाराष्‍ट्र एक्स्प्रेसच्या फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.


कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेतून पुनर्विकास


दरम्यान, रेल्वे अर्थसंकल्पांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अमृत भारत योजनेचा भाग म्हणून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या यादीत कोल्हापूर, मिरज, सांगली आणि सातारा या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी 2.41 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये सुमारे 2,800 किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्यमान रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे लाईन टाकणे यांचा समावेश आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशभरातील 1,275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. मिरज जंक्शन हे पुणे विभागातील पुण्यानंतरचे दुसरे सर्वाधिक महसूल देणारे स्टेशन आहे. पुनर्विकासांतर्गत मिरज स्थानक व फलाटांची सुधारणा, सर्व फलाटांची लांबी, रुंदी व उंची वाढवणे, पिट लाईनचे रखडलेले काम सुरु करणे, टाकणे आदी कामे करण्यात येणार आहेत.


'या' स्थानकांचा होणार पुनर्विकास


पुणे रेल्वे विभागांतर्गत मिरज, पुणे, कोल्हापूर, सातारा, चिंचवड, सांगली, कराड, हडपसर, बारामती, लोणंद, आकुर्डी, तळेगाव, हातकणंगले, वाठार, देहूरोड, उरळी, केडगाव आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या