Maharashtra Kolhapur Crime : राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाच्या विभागीय भरारी पथकाने गोवा विक्रीच्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा हस्तगत केला आहे. पथकाने कोल्हापूर शहराच्या हद्दीत ही कारवाई करताना 5 लाख 3 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने रोहित श्रीकांत मांगुरे (वय 27, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून फक्त गोव्यात विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य ब्रँडच्या 750 मिलीमधील 780 बाटल्या तसेच 180 मिलीच्या 384 बाटल्या जप्त केल्या. आरोपीकडून एकूण 73 बाॅक्स जप्त करण्यात आले.
सदर कारवाई कोल्हापूर विभागाच्या विभागीय भरारी पथकाचे विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एस. जे. डेरे, आर. जी. येवलूजे, एस. एस. गोंदकर, दुय्यम निरीक्षक श्रीमती उमा पाटील, काॅन्स्टेबल अमोल यादव, विलास पवार, सुशांत बनसोडे, दीपक कापसे, मोहन पाटील, सविता देसाई यांनी केली. पुढील तपास आर. जी. येवलुजे करत आहेत.
Maharashtra Kolhapur Crime : नेसरी-गडहिंग्लज मार्गावर लाकूडवाडी घाटात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी-गडहिंग्लज मार्गावर लाकूडवाडी घाटात चारचाकी वाहनातून लपवून नेत असलेला 4 लाख 61 हजारांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा तसेच वाहनासह 10 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. भरारी पथकाला संशयित सागर ठाकूर (रा. साठेली, सिंधुदुर्ग) व प्रदीप गावडे (कैरी, सिंधुदुर्ग) हे नेसरी गडहिंग्लज मार्गावरून पुढे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांकडे असलेले चारचाकी वाहन पथकाने थांबण्याचा इशारा करून थांबले नाही. त्यांनी पहाटेचा अंधार असल्याने वाहन सोडून पलायन केले.
भरारी पथकाने पाहणी केली असता या वाहनात 180 व 750 मिलीमधील विविध ब्रँड्सचे 74 बॉक्स सापडले. बाजारभावाने त्यांची किंमत 4 लाख 61 हजार व चारचाकी वाहनाची किंमत 6 लाख असा 10 लाखांवर मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या