Kolhapur News : अंब्याच्या हंगामाला अजून प्रारंभ झाला नसला तरी, कोल्हापूरमधील शाहू मार्केट यार्डात फळ बाजारात दक्षिण भारतामधील तसेच परदेशी आंब्याचे आगमन झाले आहे. 50 पेट्या आंबा याठिकाणी पोहोचला आहे. आलेल्या अंब्यांचे सौदे दोन दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आहे. यंदा तीन महिने अगोदरच दक्षिणेकडील केरळच्या आंब्याचे आगमन झाले आहे. या सोबतच आफ्रिकन देशातील मलावी आंबा (Malawi Mango in kolhapur) कोल्हापूरच्या बाजारपेठेत पहिल्यांदाच आला आहे. शाहू मार्केट यार्ड डीएम बागवान यांच्या 15 नंबर गाळ्यामध्ये हे आंबे उपलब्ध आहेत. 


कोल्हापूरच्या बाजारपेठेत दिवाळी संपल्यानंतर आंबा दाखल होतो. कोकणी हापूस आगमन हे मुहूर्तासाठी लवकर होत असते. मात्र, अद्याप कोकणी हापूस आंबा बाजारपेठेत आलेला नाही. दरवर्षी आंबा हंगामामध्ये हापूस आंबा व दक्षिणेकडील आंबा यांची जोरदार उलाढाल होते. दक्षिणेकडील आंबा कोकण हापूसच्या तुलनेत स्वस्त असल्याने मागणी असते. 


आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच 


मलावी देशातील हापूस आंब्याला भारतातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दरवर्षी हा आंबा देशाच्या बाजारपेठेत दाखल होतो. यावर्षी देखील मलावीमधून हापूस आंबा मुंबईच्या एपीएमसी बाजार समितीत दाखल झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. मागील पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. 15 वर्षांपूर्वी कोकणातील झाडांच्या काट्या आफ्रिकन देश मलावीमध्ये नेण्यात आल्या होत्या. जवळपास साडेचारशे एकरवर आंब्याची लागवड करण्यात आली. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्यानं या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन ते पाच हजार रुपयापर्यंत आहे. मुंबई एपीएमसीमध्ये एकूण 800 बॉक्सची आवक एपीएमसी बाजारात झाली आहे.


देवगडचा हापूसही बाजारात दाखल


कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला (Navi Mumbai APMC) रवाना झाली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे. देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे. "या आंब्यांना किती दर मिळेल यावर सर्व शेतकऱ्यांचं पुढील आर्थिक गणित अवलंबून आहे," अशी प्रतिक्रिया या आंबा बागायतदारांनी दिली.


परतीच्या पावसाचा आंब्याला फटका


दरवर्षी वाशी एपीएमसीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परतीच्या पावसामुळे झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळे आंब्याची पहिली पेटी जरी दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे.


इतर महत्वाच्या बातम्या