Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक आणि कन्नडिगांच्या दंडूकेशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून आज कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना जाहीर आव्हान दिले. आम्ही 19 डिसेंबरला बेळगावला जाणार आहोत. तुमच्यात धमक असेल, तर यावे असे जाहीर आव्हान त्यांनी दिले आहे. मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 


सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री दोन तीन आठवडे काहीही कारण नसताना षड्यंत्र रचत आहेत. बोम्मई म्हणतात निकाल आमच्याच बाजूनं लागणार असं बोलत आहेत. जाणूनबुजून महाराष्ट्राला डिवचण्याचा ते प्रयत्न करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शाह यांना देखील हा गडी (बोम्मई )घाबरत नाही. 


आम्ही 19 तारखेला बेळगावमध्ये जाणार आहोत, तुमच्यात धमक असेल तर तुम्ही देखील असे सांगत मुश्रीफ यांनी हसनशंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले. शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर सीमाभागातील परिस्थिती बदलल्याचे ते म्हणाले. 



सीमाभागातील बांधवांच्या कायम पाठीशी राहू


दरम्यान, सतेज पाटील यांनीही कर्नाटक सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर हल्ला चढवला. यावेळी बोलताना त्यांनी सीमाभागातील (maharashtra karnataka border dispute) जनतेला सोबत असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले की, आम्ही कालही आपल्यासोबत होतो, आजही आहे आणि उद्याही तुमच्यासोबत राहू. आमचा संयम सुटला तर हा प्रश्न निकाली लागण्यास वेळ लागणार नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सीमाभागातील बांधवांच्या कायम पाठीशी राहू. महामानवांचा अपमान करण्याचा सपाटा भाजपच्या नेत्यांनी सुरू ठेवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. संविधान बदलण्याचा हा डाव दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. 


तत्पूर्वी, एबीपी माझाशी बोलताना सतेज पाटील यांनी राज्यपालांच्या बैठकीत काय घडलं हे पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी केली. बोम्मई ज्या पद्धतीने ठणकावून सांगतात, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे. भाजप नेत्यांनी 24 तासात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. हे सर्व करण्यामागे कर्नाटक विधानसभा निवडणूक हा एकमेव उद्देश त्यांच्यामागे आहे. बोलून वातावरण का गढूळ करत आहात? भाजपच्या शिष्ठमंडळाने अमित शहांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या