Maharashtra Karnataka Border Dispute : सीमाभागातील कर्नाटक सरकारची अरेरावी तसेच कन्नडिगांनी घातलेला हैदोसामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडी (MVA protest against karnataka in Kolhapur) सरकारने एल्गार पुकारला आहे. कर्नाटक सरकारच्या तसेच कन्नडिंगांच्या दंडेलशाहीचा निषेध करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी महाविकास आघाडी सरकारकडून आज धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 


माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार,  विजय देवणे, मुरलीधर जाधव तसेच सीमाभागातील नेते धरणे आंदोलनात सहभागी होतील.  हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे. दरम्यान, सीमाभागातील तणाव पाहता तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. राजर्षी शाहू समाधी समाधीस्थळी सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 


सीमावादावर अमित शाहांच्या भेटीपूर्वी दिल्लीत महाराष्ट्राच्या बेकीचे दर्शन


दरम्यान, कर्नाटकच्या दंडेलशाहीविरोधात महाराष्ट्रात एकीचा सूर उमटत असताना राजधानी दिल्लीत मात्र शुक्रवारी बेकीचे दर्शन झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेट घेतली. (Maharashtra Karnataka Border Dispute) खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांना ठाकरे गटाच्या खासदारांनी विरोध केल्याने दालनातून माघारी परतावे लागले. धैर्यशील माने राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्षही आहेत.


सुप्रिया सुळेंकडून पुढाकार 


अमित शाहांची भेट घेत असताना संवेदनशील मुद्दा असल्याने सीमावादावर महाराष्ट्राची एकी दिसावी यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पुढाकार घेतला.त्यांनी भेटीला जात असताना सभागृहात उपस्थित असलेल्या शिंदे गटाच्या दोन खासदारांनाही सोबत येण्याचं आवाहन केले, पण ठाकरे गटाच्या खासदारांनी आक्षेप घेतल्यानं त्यांना गृहमंत्र्यांच्या दालनाबाहेरूनच परत फिरावं लागलं. 


भाजप राज्यसभा खासदारांच्या बैठकीत सीमावादाचा उल्लेख नाहीच


दुसरीकडे, पंतप्रधानांसोबत काल महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेशच्या भाजप राज्यसभा खासदारांची बैठक झाली, पण त्यामध्ये कोणीही सीमावादाचा उल्लेख केला नाही. सीमावादाच्या विषयावर संपूर्ण राज्याची एकी दिल्लीमध्ये दिसली असती, तर ती चांगलीच ठरली असती. मात्र,जेव्हा सभागृहात हा विषय गाजत असताना तेव्हाही दिसली नाही आणि अमित शाहांच्या भेटीला जातानाही दिसली नाही. दोन्ही गट अमित शाहांच्या भेटीसाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करत होते. आता यातून नेमकं काय साध्य होतं आणि केंद्राची पावलं किती वेगानं पडतात हे पाहावं लागेल.


इतर महत्वाच्या बातम्या