Maharashtra Karnataka Border Dispute : महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा वल्गना केल्या आहेत. अमित शहांची भेट घेऊन काही होणार नाही, सीमाप्रश्नावर तडजोड करणार नाही, अशा वल्गना केल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil on BJP over maharashtra karnataka border dispute) यांनी बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सीमाप्रश्न न्यायालयीन बाब आहे, तर बोलायचं कशाला? अशी विचारणा करत त्यांनी राजकारण सुरु असल्याचा आरोप केला.


राज्यपालांच्या बैठकीत काय घडलं हे पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे. बोम्मई ज्या पद्धतीने ठणकावून सांगतात, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे. भाजप नेत्यांनी 24 तासात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली. कोल्हापुरात आज कर्नाटकच्या दंडूकेशाहीविरोधात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सीमाभागातील नेतेही या आंदोलनाला उपस्थित आहेत. 


हे सर्व करण्यामागे कर्नाटक विधानसभा निवडणूक हा एकमेव उद्देश त्यांच्यामागे आहे. बोलून वातावरण का गढूळ करत आहात? भाजपच्या शिष्ठमंडळाने अमित शहांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल पाटील यांनी केला. सतेज पाटील पुढे म्हणाले, बोम्मई एका बाजूने म्हणतात समन्वयाने प्रश्न सोडवूया, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊया, शांततेच्या मार्गाने पुढे जाऊया म्हणतात, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्याचा प्रयत्न करत आहोत, महाराष्ट्राकडून शांततेची अपेक्षा करायची आणि तुम्ही चिथावणीखोर बोलायचं हे भाजपनं दुटप्पी धोरण बंद केलं पाहिजे. 


भाजप नेते अमित शहांना भेटणार आहेत की नाही?


सतेज पाटील पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले त्या पद्धतीने भाजपच्या बाजूने भेटणार आहेत की नाही ? नाही भेटला, तर तुमची बाजू कर्नाटकच्या बाजूने आहे हे दिसून येईल. बोम्मईंच्या वक्तव्यांचा केंद्रीय नेतृत्वाने विचार केला पाहिजे. विषयाचे गांभिर्य पाहूनच केंद्रीय गृहमंत्री भेट देत असतात. त्यांना विषय टाळायचा असता, तर त्यांनी भेट नाकारली असती. त्यामुळे त्यांची समन्वयाची भूमिका नाकारता येत नाही, पण दिल्लीत एक भूमिका आणि राज्यात एक भूमिका असं चालणार नाही. भूमिका स्पष्टपणे आली पाहिजे अशी आमची भूमिका आहे.


इतर महत्वाच्या बातम्या