कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.  चंदगड तालुक्यातील ठेकोळी येथे गोव्याहून येणाऱ्या अवैध मद्य वाहतूकीवर छापा टाकून वाहनासह एकुण 7. 84 लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रविंद्र आवळे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.


कोल्हापूर भरारी पथकास मिळालेल्या बातमीनुसार, ढेकोळी-सुरुते रस्ता, ढेकोळी प्राथमिक शाळेजवळ पाळत ठेवली असता मंगळवारी रात्री 07.30 वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची बोलेरो घेऊन आला. MH-06-BE-9615 असा त्या गाडीचा नंबर होता. सदर वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील सीटवर गोव्यातून आणलेली आणि फक्त गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले, तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याने भरलेले 750 आणि 180 मिलीचे 24 बॉक्स सापडले. 


सदर प्रकरणी संजय पांडुरंग नाईक (वय 37) रा. हलकर्णी, या आरोपीस अटक करण्यात आली. यामध्ये गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास चालू आहे. पकडण्यात आलेल्या महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडीमध्ये गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य मॅकडॉल नं.01 व्हिस्कीचे 750 मिलीचे 02 बॉक्स, मॅकडॉल नं.01 व्हिस्कीचे 180 मिलीचे 02 बॉक्स व गोल्डन आईस ब्ल्यू व्हिस्कीचे 180 मिलीचे 20 बॉक्स असे 208.08 ब.लि. इतके मद्य मिळून आले.


हा सर्व मद्यसाठा, वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रूपये 7,84,200 इतकी असून निव्वळ मद्याची किंमत 1,44,000 इतकी आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदाराचा सहभाग आहे का? याबाबतची माहिती तपासी अधिकारी निरीक्षक एस. एम. मस्करे यांनी सांगितले.


सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम.मस्करे, दु.निरीक्षक जी.बी.कर्चे, दु. निरीक्षक ए.बी. साबळे, जवान सचिन लोंढे, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल भोई, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला.


ही बातमी वाचा: