Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) फाईव्ह स्टार एमआयडीसीमधील (Kagal MIDC) ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बगॅसवर वीज कोसळून आज पहाटे आग लागली. यामध्ये तब्बल 1450 मेट्रिक टन बगॅस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे 50 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे. डाव्या कालव्या शेजारी असलेल्या खासगी माळावर सोमवारी 30 एकर परिसरात या कंपनीचे बगॅसचे 35 डेपो आहेत. डेपो नंबर 9 मधील बगॅसवर वीज कोसळली. यानंतर बगॅसने पेट घेतला. त्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले. रात्रीपासूनच आग आटोक्यात आणण्यासाठी कागल नगरपरिषद, कोल्हापूर महानगरपालिका, स्वामी पाणीपुरवठा, कागल औद्योगिक वसाहत, जवाहर साखर कारखाना, श्रीराम पाणीपुरवठा आदींच्या अग्निशमक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यात आली. 


गारगोटीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ


दरम्यान, गारगोटी शहरासह परिसरात बुधवारी अवकाळी पावसाने कहर केला. या पावसामुळे आठवडी बाजारात ग्राहक आणि व्यापारी यांची एकच तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. बाजारात व्यापाऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान झाले. दुपारी चारच्या सुमारास अचानक ढग जमून येऊन विजेचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.


गारगोटी येथील बुधवारी आठवडी बाजार असल्याने आसपासच्या खेड्यातील शेतकरी आपल्या शेतातील पालेभाज्या घेऊन आले होते. पण अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी, व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले. दमदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. तर गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या होत्या. येथील मुख्य बाजारपेठेत या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या भाज्या वाहून गेल्या. या पावसामुळे शेतातील पिकांना दिलासा मिळाला आहे.


अवकाळी पावसाचा इशारा 


दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. मध्यम ते अतिवृष्टी असे पावसाचे स्वरूप असण्याची शक्यता वर्तवली आहे. 17 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तुरळक, मध्यम, अति आणि अतिवृष्टी असे पावसाचे स्वरूप असणार आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या