Karnataka Election: कर्नाटकमधील भाजप सरकार 40 टक्के कमिशनच्या आरोपांनी पार रसातळाला गेलेल्या भाजपला कर्नाटक विधानसभेमध्ये एवढ्या दारुण आणि एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागेल, याची कल्पना देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह राज्यांतील नेतृत्वाने केली नसेल. मात्र, ज्या पद्धतीने भाजपचा दारुण पराभव कर्नाटकच्या निवडणुकीनंतर झाला आहे तो त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असेल यात शंका नाही. स्थानिक मुद्यांना हद्दपार करुन राष्ट्रीय मुद्यांवरुन आणि एकच चेहरा सगळीकडे घेऊन मिरवणाऱ्यांना मतदारांनी एकप्रकार चपराक देत जमिनीवर आणण्याचे काम केले आहे. कर्नाटकी जनतेने काँग्रेसला प्रचंज बहुमताने एकहाती सत्ता दिली. मात्र, भाजपला तब्बल 9 जिल्ह्यातून पार हद्दपार करुन टाकले आहे. ज्या ठिकाणांवर भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या त्या ठिकाणीसुद्धा कर्नाटकी जनतेने भाजपला अस्मान दाखवले आहे. जुन्या मैसूरच्या मतदारांकडून भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तिथेही पराभव चाखावा लागला आहे.

  


मध्य कर्नाटकमध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. नऊ जिल्ह्यांमध्ये भाजपला खाते सुध्दा उघडता आलेलं नाही, इतकी दूरवस्था मतदारांनी करुन टाकली आहे दुसऱ्या आठ जिल्ह्यांमध्ये केवळ एका स्थानावर समाधान मानावे लागले आहे. उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. एकूण 24 जिल्ह्यांमध्ये भाजपची तीन भागांमध्येही खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे पराभवाची व्याप्ती वाढली आहे. केवळ बंगळूर शहर, बेळगाव, बिदर, उडपी शहरांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. चिकमंगळूर, बळ्ळारी, कोडगू या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्येही दाणादाण झाली आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. तसाच काहीसा प्रकार कर्नाटकातील 9 जिल्ह्यात झाला आहे. 


केंद्रीय नेतृत्व प्रचारात अन् स्थानिक नेते आणि मुद्देही गायब 


कर्नाटक निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच केंद्रस्थानी होते. शेकडोंच्या सभा, रॅली, पुष्पवर्षावाचे इलेक्ट्रॉनिक मीडियात थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच सातत्याने काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काय होईल याची भीतीही मतदारांना घालण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर बजरंग बलीवरुन धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, या सर्व प्रयत्नांना आणि भीतीला न जुमानता कर्नाटकी जनतेने आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं आहे. 


ज्या पद्धतीने केंद्रीय मुद्द्यांवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न भाजपने सातत्याने केला, मात्र याला अस्मान दाखवण्याचं काम झालं आहे. काँग्रेसकडून ही निवडणूक पूर्णतः स्थानिक मुद्द्यांवर आणि स्थानिक नेतृत्वामध्येच लढवली गेली. राहुल गांधी यांच्या एका सभेत राष्ट्रीय मुद्दे उपस्थित झाला तो वगळता राहुल गांधी यांनीही नंतर सर्व भाषणातून सातत्याने कर्नाटकशी निगडीत तसेच कर्नाटकी जनतेच्या समस्यांवर सातत्याने बोलत राहिले. काँग्रेसकडून देण्यात आलेली आश्वासने ही फक्त कर्नाटकशी निगडीत आहेत. हाच फरक हा नेमका भाजप आणि काँग्रेसच्या रणनीतीमध्ये दिसून आला. 


इतर महत्वाच्या बातम्या