Kolhapur Water Crisis : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून पाणीदार असलेल्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात 'पाणीबाणी'ची वेळ आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नद्यांनी तळ गाठल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. अजून मे महिना बाकी असताना एप्रिलपासूनच नद्यांनी तळ गाठल्याने जिल्ह्यातील परिस्थिती आव्हानात्मक होत चालली आहे. गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून ऐन सणासुदीत महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे घागर घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टँकर्सकडूनही पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने बोअरवेलचा पर्याय घेतला जात आहे. मात्र, उन्हाळ्यात बहुतांश बोअरवेलला पाणी कमी येत असल्याने संकटाची मालिका सुरु आहे. महापालिकेकडून 9 टँकर्सची सोय करण्यात आली आहे. 


कोल्हापूर शहराला पंचगंगा (Panchganga River) आणि भोगावती नदीतून (Bhogavati River)  पाणी उपसा केला जातो. मात्र, याच दोन्ही नद्यांनी तळ गाठल्याने उपसा होण्यावर विपरित परिणाम झाला आहे. उपसा पूर्ण क्षमतेने होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा गंभीर झाला आहे. थेट पाईपलाईन पाणी योजना अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे शहरवासियांची भर उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु आहे. दुसरीकडे, कुंभी नदीने सुद्धा तळ गाठला आहे. कोल्हापूर शहरासाठी भोगावती नदीतून पाणी उपसा करण्यासाठी बालिंगा केंद्रात चार आणि नागदेववाडी केंद्रात दोन उपसा पंप आहेत. मात्र, नदीने तळ गाठल्याने उपसा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु केल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे. 


शेती पाण्यासाठी उपसाबंदीचा आदेश अन् माघार 


दुसरीकडे, पंचगंगा आणि भोगावती तसेच दुधगंगा नद्यांच्या दोन्ही काठावर भागांत शेतीसाठी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत. उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल आणि होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असा इशारा बांदिवडेकर यांनी दिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने उपसाबंदी लागू केल्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच आंदोलनाची घोषणा केली होती. त्यामुले आंदोलकांचा पवित्रा आणि मागणी पाहून उपसा बंदीचा आदेश मागे घेण्यात आला. 


एप्रिलपासून मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोल्हापूर आणि परिसरातील नदीकाठच्या गावांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी साडेतीन ते चार टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. राधानगरी धरणामध्ये 3.37 टीएमसी पाणी शिल्लक आहे. गैबीमध्ये एक टीएमसी पाणी उपलब्ध आहे. तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतून किमान अर्धा टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. सध्या धरणांमध्ये पाणीसाठा असला तरी पावसाळा लांबला तर मात्र, पाण्याची फार टंचाई भासू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या