Rajaram Sakhar Karkhana : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्यासाठी अत्यंत ईर्ष्येने सायंकाळी चार वाजेपर्यंत 90.12 टक्के मतदानाची नोंद झाली. सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिकांसह खासदार धनंजय महाडिक यांनी विजयाचा दावा केला आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात तगडे आव्हान निर्माण केलेल्या विरोधी परिवर्तन आघाडीकडूनही सत्तांतराचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता 25 एप्रिल रोजीच्या निकालाकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये मतदान केंद्रावर सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. अमल महाडिक यांनी पेठवडगाव केंद्रावर मतदान केले. शौमिका महाडिक यांनी शिये मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार
धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विजयाची ग्वाही दिली होती. महाडिक म्हणाले की, "छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतून संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. महादेवराव महाडिक हा जिल्ह्याचा जादूगार असल्याने निकाल सांगण्याची गरज नाही. राजाराम कारखान्याची निवडणूक आम्ही जिंकणार आहोत. संस्था गटातील 129 पैकी 90 मतदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे या ठिकाणी आम्हीच विजयी होऊ असा दावाही त्यांनी यावेळी केला.
सतेज पाटील काय म्हणाले?
सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांनी केलेल्या दाव्यानंतर बोलताना सांगितले की, "सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियावर उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही. ऊसाला दोनशे रुपये दर का कमी मिळतो? हे आता शेतकऱ्यांना पटलेलं आहे. त्यामुळे परिवर्तनाची लाट आली आहे. अनेक गावात आमच्या बाजूने उत्साहात मतदान होत आहे. सत्ताधाऱ्यांकडे बूथ टाकायला जागा नाही, त्यामुळे यंदा छत्रपती राजाराम साखर कारखान्यात परिवर्तन होणार आहे. सभासदांना गृहित धरणं चुकीचं आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांच्या मोठ्या बोलण्याला अर्थ नाही." संस्था गटातील आमच्याकडे 75 मतदान असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. ते जर आमच्याकडे 90 आहेत म्हणत असतील, तर आमच्यासोबत आलेली 40 ते 50 लोक कोण आहेत? सभासदांना गृहित धरुन कोणी बोलत असेल तर ते चुकीचं आहे.
महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले की, "महाडिकांना निवडणूक नेहमीच सोपी असते. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. माझं कसं असतं धर की पकड आणि स्वारी घाल ते लगेच चिटपट कर. त्यामुळे माझ्यासाठी राजारामची लढाई छोटी आहे, आमचा विजय निश्चित आहे." दरम्यान, राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या