Jyotiraditya Shinde : कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरु करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. अरिहंत जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल यांनी निवेदनातून ही मागणी केली आहे. कोल्हापूर ते मुंबईदरम्यान वंदे भारत किंवा दुरांतो एक्स्प्रेससारखी सुपरफास्ट रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईला जाण्यासाठी कोल्हापुरातून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला गर्दी असते. या महालक्ष्मी एक्स्प्रेसला निर्धारित प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 11 तासांचा अवधी लागतो. याउलट राष्ट्रीय महामार्गाने जाण्यासाठी सुमारे सात तासांत मुंबईला पोहोचणे शक्य होते. बंद झालेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत विविध औद्योगिक व्यापारी व सामाजिक संघटनांतर्फे वेळोवेळी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
कोल्हापूर ते अहमदाबाद दरम्यान धावणारी अहमदाबाद एक्स्प्रेस आठवड्यातून एकदाच सोडली जाते. ती किमान तीन दिवस सोडणे गरजेचे आहे. राणी चन्नम्मा एक्स्प्रेस कोरोना काळापूर्वी कोल्हापूरहून सुटत होती. ती कोरोनानंतर मिरजेतून सोडली जाते. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूर ते मिरज व मिरजेतून पुढे प्रवास करावा लागतो. ही एक्स्प्रेस कोल्हापुरातूनच सोडण्यात यावी. कोल्हापूर ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी.
विविध गाड्यांना जादा डबे जोडण्यात येणार
दरम्यान, गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस रेल्वे लवकरच सुरू केली जाणार आहे. सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी दिल्ली मुख्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत मान्यता मिळताच रेल्वे सुरू होईल. त्यासोबत विविध गाड्यांना जादा डबे जोडण्यात येतील, असे आश्वासन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे येथे झालेल्या रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत दिले आहे.
दरम्यान, पुढील महिन्यापासून कोल्हापूर निजामुद्दीन, कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेस, कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसला जादा बोगी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे याचा फायदा कोल्हापूरसह सांगली मिरज शहरातील प्रवाशांना होणार आहे. सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत कोल्हापूर निजामुद्दीन एक्स्प्रेसला तीन जादा बोगी आणि कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेसला तीन जादा बोगी, कोल्हापूर मुंबई कोयना एक्स्प्रेसला तीन जनरल बोगी, कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्स्प्रेसला दोन स्लीपर डबे, दोन एसी थ्री टायर बोगी आणि कोल्हापूर नागपूर एक्स्प्रेसला एक जादा बोगी लावण्याचा सदस्यांच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या