Kolhapur Shahi Dasara : कोल्हापूर मनपाकडून आयोजित केलेल्या शाही दसरा फेस्टीवल स्ट्रीटमधून शहरातील व ग्रामीण भागातील 130 बचत गटांच्या स्टॉलमधून पावणे पाच लाखांवर उलाढाल झाली आहे. देदीपम्यान परंपरा असलेला कोल्हापूरचा शाही दसरा यंदा दोन दिवस साजरा करण्यात आला.


पहिल्या दिवशी 4 तारखेला बचत गटांची 39 हजार 430, तर विजयादशमीला 1 लाख 42 हजार 400 रुपयांवर शहरातील बचत गटांचे उत्पन्न झाले. ग्रामीण भागातील बचत गटांचे पहिल्या दिवशी 1 लाख 81 हजार 307, तर विजयादशमीला 2 लाख 12 हजार 290 रुपयांचे उत्पन्न झाले. 


शहरातील बचत गटांनी 54 व ग्रामीण भागातील 67 बचत गटांनी प्रामुख्याने सेंद्रीय हळद, शेवगा, आयुर्वेदिक उत्पादने, कोल्हापूरी मसाले, कापडी पिशव्या, फनि गेम्स, काजूगर, विविध प्रकारची बिस्कीटे, चटणी, थाली पीठ, लस्सी, ज्युस, वडापाव, लोणी डोसा, पापड लोणचे, व्हेज पुलाव, बिर्याणी असे विविध पदार्थ्यांचे स्टॉल लावले होते.


याचबरोबर न्यू पॅलेसमधून दसरा चौक मार्गावर माध्यमिक शाळेतील मुलांचे लेझीम, झांजपथके, रांगोळी, लाठीकाठी, शाहिर पोवाडा, धनगरी ढोल, मनोरंजनाचे कार्यक्रमही घेण्यात आले. दसरा चौक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दिव्यांगांना, लहान मुलांना व जेष्ठ नागरीकांना जवळून शाही दसरा पाहता येत नाही. त्यामुळे दसरा मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूस त्यांना उभे राहून शाही परिवाराला शुभेच्छा देता आल्या. त्याचबरोबर एनसीसी, आरएसपीचे विद्यार्थ्यांनी या शाही परिवाराव पुष्पवृष्टी केली.


महापालिकेचे नियोजन


शाही दसरा महोत्सवासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी चोख नियोजन करुन हा महोत्सव पार पाडला. पालिकेकडून न्यू पॅलेस ते सीपीआर चौक मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस मार्किंग करण्यात आले होते. त्याचबरोबर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. महोत्सवाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था, 1 वैद्यकीय पथक, अग्निशमन गाडी, पिण्याचा पाण्याचा 6 टँकर व तीन दिवस स्वच्छता कर्मचाऱ्यांची व्यवस्था, मंडपची व्यवस्था केली होती. 


महापालिका मुख्य इमारत व शहरातील मुख्य पुतळयांभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हे सर्व नियोजन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औधकर, सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे यांनी केले. 


इतर महत्वाच्या बातम्या