कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षांपासून बंद करण्यात आलेली सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर ते कलबुर्गी एक्सप्रेस सकाळच्या सत्रात तसेच पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूरहून कुर्डूवाडीपर्यंत पॅसेंजर सुरु करण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी मान्यता दिली आहे. या निर्णयांची अंमलबजावणी 15 दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांकडून सह्याद्री एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. 


पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी कोल्हापूरहून कुर्डूवाडी मार्गावर पहाटे 5 वाजून 50 मिनिटांनी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सल्लागार सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली आहे. दादर ते पंढरपूर एक्सप्रेसचा विस्तार मिरजेपर्यंत आणि कोल्हापूर ते सिकंदराबाद व्हाया कलबुर्गी एक्सप्रेस साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिरज ते पुणे आणि मिरज ते कोल्हापूर या विभागांमध्ये काही एक्सप्रेस गाड्यांना वळीवडे, रुकडी, सांगली, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड आणि सातारा येथे थांबा मिळणार आहे. यातील काही रेल्वे स्थानकांवर थांबा सुरु झाल्याची माहिती सीनियर डिव्हिजन ऑपरेटर मॅनेजर डॉ. स्वप्रिल नीला यांनी दिली आहे. मिरज जंक्शन रेल्वेस्थानकाचा मॉडेल स्थानक म्हणूनच पुनर्विकास केला जाणार असल्याची माहिती पुणे विभागीय प्रबंधक इंदु दुबे यांनी शुक्रवारी जाहीर केले. यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 


कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला गती मिळणार


दुसरीकडे, बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित कोकण रेल्वेला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाला गती मिळण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेला वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही शिफारस 53 व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या (एनपीजी) बैठकीत करण्यात आली आहे. 


या बैठकीत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्प अशा एकूण 28,875.16 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. हे प्रकल्प सामाजिक व आर्थिक विकासासाठी मल्टीमाॅडल कनेक्टिव्हिटी पुरवतील आणि सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताणही कमी करतील असे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (DPIIT) लॉजिस्टिक्स सचिवांनी बैठकीत माहिती दिली. देशाच्या विकासातील मैलाचा दगड ठरलेल्या कोकण रेल्वेला जोडण्यासाठी कोल्हापूर वैभववाडी मार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणमध्ये औद्योगिक, शेतीसाठी रस्तेमार्गानेच वाहतूक केली जाते. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग झाल्यास महाराष्ट्राला लाभ होणार आहेच, पण कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :