Kolhapur Railway: मध्य रेल्वेकडून नांद्रे ते सांगली रेल्वे मार्गावर दुहेरीकरण व दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी (10 जुलै) कोल्हापुरातून (Kolhapur News) सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्यांचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. तसेच काही रेल्वे मार्गात व वेळेत बदल केले आहेत. याबाबतची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-सातारा पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


पुणे ते कोल्हापूर मार्गावरही रेल्वे धावणार नाही


10 जुलै रौजी रवाना होणाऱ्या कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस कोल्हापुरातून नियोजित वेळेत न सुटता रात्री 11 वाजता सुटणार आहे. गोंदियावरून 9 जुलैला कोल्हापूरसाठी येणारी गोंदिया ते कोल्हापूर महाराष्ट एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यातच थांबेल. पुणे ते कोल्हापूर मार्गावरही रेल्वे धावणार नाही. 10 जुलै रोजी कोल्हापुरातून सुटणारी कोल्हापूर ते गोंदिया एक्स्प्रेस पुण्यातून आपल्या नियोजित वेळेत म्हणजे रात्री 10.25 मिनिटांनी गोंदियाला प्रस्थान करेल. कोल्हापूर ते पुणे मार्गावर प्रवास करणार नाही. 10 जुलैला कोल्हापुरातून निघणाऱ्या कोल्हापूर ते सांगली एक्स्प्रेसचा प्रवास मिरजमध्ये थांबेल. मिरज ते सांगलीदरम्यान प्रवास रद्द असेल.


या रेल्वे मार्गात बदल 


9 जुलैला दादरवरून निघणारी गाडी दादर ते हुबळी एक्स्प्रेस, अजमेर ते म्हैसूर एक्स्प्रेस, अहमदाबाद ते कोल्हापूर एक्स्प्रेस, हसरत निजामउद्दीन-वास्को-गोवा एक्स्प्रेस गाडी दौंड - कुर्डूवाडी- मिरज मार्गावरून धावेल.  9 जुलैला बंगळूरवरून जोधपूरला सुटणारी जोधपूर एक्स्प्रेस, पुदुच्चरी -दादर एक्स्प्रेस व 10 जुलैला हुबळीवरून दादरला सुटणारी एक्स्प्रेस गाडी मिरज, कुर्डूवाडी, दौंड या मार्गावरून धावतील. या गाड्या पुणे ते मिरज मार्गावरील थांब्यांवर धावणार नाहीत.


सह्याद्री एक्सप्रेस त्वरीत सुरू करा


दरम्यान, कोल्हापुरातून सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. मात्र, सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस एकमेव गाडी सध्या मुंबईला जाणारी असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. ज्या महिला मुंबईला जातात, त्यांना तर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस त्वरीत सुरू करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीकडून दोन दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. रेल्वे प्रबंधक विजयकुमार यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले. ही गाडी त्वरीत सुरू नाही झाली तर महिला आघाडीकडून ट्रेन रोको आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या