Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या आणि कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद सुरु असतानाच आता गाढवानेही सुद्धा दहशत सुरु केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गाढवाने केलेल्या हल्ल्यात दोन पुरुषांसह एक शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. गाढवानं केलेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये गाढवाने धक्का देऊन रस्त्यावर पाडल्यानंतर पायाचा  चावा घेताना दिसत आहे. मात्र, दगड काठीने मारूनही गाढव बाजूला होत नसल्याचे  दिसून येते. त्यानंतर पाठिमागून आलेल्या एका तरुणाने काठीने सलग दणके दिल्यानंतर रस्त्यावर धडक देऊन पाडलेल्या वृद्धाची सुटका झाली. 


गांधीनगरमध्ये विक्रम हायस्कूलच्या मैदानात मोकाट गाढवाने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये लक्ष्मण देऊ कुसाळे (वय 75) गोपीचंद वरुमल कामरा (वय 52 दोघे रा. वळीवडे, ता. करवीर) आणि मयुरी कुमार जाधव (वय 11 रा. पवार मळा, उचगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या जखमींवर गांधीनगरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


गेल्या काही दिवसांपासून गांधीनगर तसेच वळीवडे भागात भटक्या जनावरांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना आणि बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना होत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे ग्रामस्थांसह बाजारपेठेत येणारे नागरिक भयभीत होऊन गेले आहेत. काही दिवसांपूर्वी याच भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 13 जण जखमी झाले होते. त्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झालेल्या नसतानाच आता गाढवांची भर पडल्याने  लोकांनी नेमकी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. गांधीनगर आणि वळीवडे ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोकाट जनावरे फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी असा सूर ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. एकंदरीत या प्रकारामुळे या प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत होऊन गेले आहेत. 


इचलकरंजीमध्येही भटक्या कुत्र्यांचा चावा 


गांधीनगर वळीवडे भागात भटक्या कुत्र्यांची दहशत सुरु असतानाच इचलकरंजीमध्येही तीच स्थिती आहे. इचलकरंजी शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल १७ जण मे महिन्यात जखमी झाले होते. भटक्या कुत्र्यांनी जीवघेण्या हल्ल्यात शहरातील 15 तर ग्रामीण भागातील 2 जणांना जखमी केले होते. यामध्ये तीन बालकांचा समावेश होता. दुसरीकडे, अवघ्या 10 दिवसांपूर्वीच करवीर तालुक्यातील तेरसवाडी, कदमवाडी, दोनवडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ बकऱ्या ठार झाल्या होत्या. या भागातही भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या