Kolhapur Police: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्ताची तयारी सुरु असतानाच थेट कोल्हापूर पोलिस (Kolhapur Police) अधीक्षक कार्यालयात लाच घेऊन खळबळ उडवून देणाऱ्या महिला काॅन्स्टेबलला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. काजल गणेश लोंढे (वय 28, रा. पसरिचानगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. काजल लोंढेच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढले. काजल लोंढेची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे. या महिला कॉन्स्टेबला कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयामधील महिला सहाय्य कक्षातच दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडण्यात आले. कौटुंबिक वादामधील तक्रारीत समुपदेशनानंतर वाद मिटल्यावर तिने लाचेची मागणी केली होती. त्यामुळे सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती.
तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी
तक्रारदाराने महिन्यापूर्वी पत्नीविरोधात कौटुंबिक वादाचा अर्ज महिला सहाय्य कक्षात दिला होता. या विभागात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल काजलने तक्रारदार पती आणि त्याच्या पत्नीला बोलवून समुपदेशन केलं. यानंतर वाद मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी तिने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी संध्याकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात सापळा लावला. महिला सहाय्य कक्षात लाच स्वीकारताच पथकाने काजलला रंगेहाथ पकडले. काजल लोंढे 2014 पासून पोलीस दलात आहे. आठ महिन्यांपूर्वी तिची नियुक्ती कोल्हापुरातील महिला सहाय्य कक्षात झाली आहे. लाच घेताना सापडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने तातडीने तिच्या घरीही झडती घेतली. त्याठिकाणी विशेष काही हाती लागले नाही.
लाचप्रकरणी तलाठ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी
दरम्यान, खरेदी केलेल्या जमिनीच्या आणि बँकेच्या कर्जाच्या दस्ताची फेरफार नोंद करण्यासाठी उमेदवाराकडून 20 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या साजणी-तिळवणीचा तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे आणि उमेदवार साहिल यासीन फरास या दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. जमिनीवर काढलेल्या बँकेच्या कर्जाच्या दस्ताची फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाचेची रक्कम उमेदवार साहिलला घेण्यास सांगितले होते. गावचावडीत लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लावलेल्या सापळ्यात साहिल फरास हा रंगेहाथ सापडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या