Kolhapur Police: कोल्हापुरातील (Kolhapur Police) राजेंद्रनगर परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी घेतल्यानंतर एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. साहिल मिनेकर असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर दत्तात्रय देवकुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्रनगरमध्ये (18 जून) ही घटना घडली होती. 


छाप्याची चौकशी करण्याचे आदेश 


आता या प्रकरणी, राजेंद्रनगरमध्ये छापा टाकण्यासाठी गेलेल्या चौघा पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जोपर्यंत चौकशी सुरू आहे आणि पुढील आदेश होत नाही, तोपर्यंत चारही पोलिसांना पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. या छाप्याची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक पंडित यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांना दिले आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यातील विशाल शिरगावंकर, सत्यजित सावंत, विशाल तळेकर, संदीप सावंत यांनी रविवारी रात्री राजेंद्रनगरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी छाप्याच्या भीतीने तरुणाने इमारतीवरून खाली उडी घेतली. यात त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण जखमी झाला.


चारही पोलिसांची नियुक्ती मुख्यालयात


हा छापा पडला, तेव्हा नेमकी वस्तुस्थिती काय आहे, यामध्ये पोलिसांचा काही संबंध आहे का? त्यांची काय चूक आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीमध्ये कोठेही अडथळे येवू नयेत, ती पारदर्शी व्हावी, म्हणून चारही पोलिसांची नियुक्ती मुख्यालयात केली असल्याचेही अधीक्षक पंडित यांनी सांगितले. 


राजेंद्रनगरमध्ये नेमकं काय घडलं?


राजेंद्रनगरात एका दुमजली इमारतीमध्ये काही तरुण रविवारी रात्री जुगार खेळत होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास तिथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच तरुणांची पळापळ झाली. पोलीस पकडतील या भीतीने साहिल आणि दत्तात्रय या दोन तरुणांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली उडी मारली. मात्र दगडावर डोके आपटल्याने साहिल मिनेकरचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे हा तरुण जखमी झाला. साहिल हा खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत होता.  त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या