Kolhapur News: केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशात पाणीदार जिल्हा म्हणून प्रचलित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) धरणांची पाणीपातळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. काळम्मावाडी धरण इतिहासात प्रथमच कोरडं पडलं आहे. त्यामुळे धरणात आजघडीला केवळ 1.31 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी याचदिवशी 6.14 टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुवठा करणारी थेट पाईपलाईन योजना काळम्मावाडी धरणामधूनच आहे. ही योजना पूर्णत्वास जात आहे. दुसरीकडे, राधानगरी धरणात फक्त 1.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामधील 1 टीएमसी मृत पाणीसाठा, तर 0.66 टीएमसी वापरता येणार आहे. त्यामुळे चालू आठवड्यापुरताच पाणीसाठा जिल्ह्यात शिल्लक आहे. 


पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती गंभीर 


मोसमी पाऊस लांबल्याने धरणांनी तळ गाठल्याने वेळ पडल्यास नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात अडचणी येणार आहेत. काळम्मावाडी धरणातील पाणीसाठी धरण कोरडे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणाची पाणी क्षमता 25.39 टीएमएसी असली, तरी धरणात केवळ 1.31 टीएमसी पाणी आहे. धरणाने तळ गाठल्याने तळापासून ते पार टोकापर्यंत धरणांच्या भिंती दिसू लागल्या आहेत. काळम्मावाडी धरणातील पाणी दूधगंगा नदी, डावा कालवा आणि उजवा कालवा यामधून सिंचनासाठी विसर्गित केले जाते. शिवाय गैबी बोगद्यामधून भोगावती नदीपात्रात सोडले जाते. कोल्हापूर शहरासाठी पाणी उपसा भोगावती आणि पंचगंगा नदीतून केला जातो. 


कमी पाणीसाठा मुळावर आला? 


दुसरीकडे, ग्राऊंटिंगच्या कामासाठी काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा जाणीवपूर्वक कमी करण्यात आला होता. आता हा डाव अंगलट येणार का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्राऊंटिंगच्या कामसाठी धरणातून सहा टीएमसी पाणी कमी केल्याने भोगावती व दूधगंगा पात्रात आवर्तने कमी झाल्याने शेतीला पाण्याचा तुटवडा भासत आहे. त्याचा थेट फटका नदीकाठावरील उभ्या पिकांना बसला आहे. ग्राऊंटिंग कामाची कोणतीही पूर्वतयारी व नियोजन नसताना गेल्या पावसाळ्यात धरणात सहा टीएमसी इतका क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा करण्यात आला आहे. 


पेरणी करण्याची घाई करू नका


किमान सलग तीन दिवस अथवा 65 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस होवून जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणात ओलावा तयार झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मान्सूनच्या चालू हंगामात जून महिन्यातील 21 दिवस उलटूनही नैऋत्य मौसमी पावसाला जिल्ह्यात सुरुवात झालेली नाही. शेतीच्या मशागतीसाठी अत्यावश्यक असलेला एप्रिल व मे महिन्यामध्ये वळीव पावसाचा थेंबही कोसळला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी जमिनीच्या मशागती पूर्ण झालेल्या नाहीत.


इतर महत्वाच्या बातम्या