Kolhapur News: कोल्हापूर शहरातील (Kolhapur Rain Update) ऐतिहासिक खासबाग मैदानाची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. आज (27 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत पती अर्जुन गुडुळकर देखील जखमी झाले आहेत.


जखमी झालेल्या पती आणि नणंद यांना उपचारासाठी नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची घटनेची माहिती समजल्यानंतर तहसिलदार समीर माने, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, निवासी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.  


महिलेचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू


दुसरीकडे, कोल्हापुरात (Kolhapur Rain Update) खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. नाटक पाहण्यासाठी आलेल्या दोन महिला या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. नंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. पण त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. अश्विनी यादव असे मृत महिलेचे नाव असून संध्या तेली ही महिला जखमी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात आले.


दोन्ही महिलांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत द्या


दरम्यान, संध्या तेली या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही महिलांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून द्यावी, त्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांना दिले. जखमी तेली यांच्या प्रकृतीची विचारपूस दवाखान्यात जावून भाजप शिष्टमंडळाने केली. जखमी तेली यांचा उपचारांचा खर्च करण्यासाठी शासनाच्या योजनेतून निधी उपलब्ध करून देऊ. मात्र शासकीय योजनेतून निधी मिळाला नाही तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून आर्थिक मदत उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी तेली कुटुंबियांना दिले.


इतर महत्वाच्या बातम्या :