Kolhapur News : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा कोल्हापुरात (Kolhapur) पार पडणार आहे. महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एप्रिल रोजी पार पडली होती. यानंतर दुसरी सभा 16 एप्रिल रोजी नागपूरमध्ये होत असून त्यानंतर 28 एप्रिल रोजी कोल्हापुरात होईल. पुण्यामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी संयुक्त सभा घेण्याचे नियोजन केले आहे. 


सतेज पाटील यांच्यावर जबाबदारी  


दरम्यान, कोल्हापुरात होत असलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभेची तयारी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर असेल. तिसरी सभा कोल्हापुरात होणार असली या सभेसाठी अजून मैदान निश्चित झालेलं नाही. मात्र सभेसाठी कळंब्यातील तपोवन मैदानाची शक्यता नाकारता येत नाही. या सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं जाईल यात शंका नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचण्यापूर्वी तयारीसाठी पहिली सभा कोल्हापुरात पार पडली होती. यात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचार तसेच सभेच्या नियोजनाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांनीच पार पाडली होती.


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास सरकार कोसळल्यानंतर मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभेसाठी नवीन चेहरे आणि समीकरणे असण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेला भगदाड, दोन्ही खासदारही द्विधा मनस्थितीत 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही मोठा फटका बसला आहे. खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके शिंदे गटात सामील झाल्याने कोल्हापुरात शिवसेनेत पदाधिकारी ठाकरे गटात आणि नेते शिंदेसोबत अशी स्थिती झाली आहे. दुसरीकडे, भाजपकडून दोन्ही लोकसभेच्या जागेसाठी जय्यत तयारी सुरु आहे. 


स्वत: केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे दोन्ही खासदार शिवसेनेच्याच चिन्हावर लढणार का? तसेच भाजप त्यांनाच उमेदवारी देऊन रिंगणात उतरवणार का? याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. भाजपकडून सुरु असलेली तयारी पाहता लोकसभेला उमेदवार कोणीही असला, तरी भाजपच्याच चिन्हावर लढेल, अशीच चर्चा आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही कोण रिंगणात असणार? याबाबत स्पष्टता झालेली नाही. नावे बरीच चर्चेत असली, तरी 28 एप्रिलच्या सभेत थेट महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर हजेरी लावून काही संकेत देणार का? याचीही उत्सुकता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या