Kolhapur News: 'द केरळ स्टोरी'चित्रपटाचा संदर्भ घेत एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मुस्लिम समाजाकडून निषेध म्हणून आजरा बंदची हाक देण्यात आली आहे. काल (10 मे) सायंकाळच्या सुमारास एका हिंदू मुलाकडून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणारा संदेश सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुस्लिम समाजातील काही लोकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करून तत्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या तरुणावर आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा निषेध म्हणून आज आजरा बंदची हाक देण्यात आली आहे.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यामधील सध्या बाहेरगावी राहणाऱ्या एका तरुणाने 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा संदर्भ घेत मुस्लिम बांधवांची भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर केली. यानंतर ही बातमी संध्याकाळी तालुक्यात पसरल्यानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने आजरा पोलिस स्टेशनच्या दारात एकत्र आले व संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्याची मागणी केली. 


यावेळी पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्यासह अन्य पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना पाचारण केले. उपविभागीय अधिकारी राजीव नवले व स्थानिक सहा. पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी पोलीसांनी उपस्थित असणाऱ्या मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळीसोबत बैठकही घेतली. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन वातावरण बिघडतील अशी कृती करू नका असे आवाहनही त्यांनी केले. संबंधित तरुणास अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर मुस्लिम संघटनाकडून आजरा बंदची हाक देण्यात आली आहे, तर शहरामध्ये या घटनेच्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या