Rajarshi Shahu Purskar: कोल्हापूरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा 'राजर्षी शाहू पुरस्कार' ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दाम्पत्याला (Abhay Bang and Rani Bang) जाहीर झाला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला 'राजर्षी शाहू पुरस्कार' देऊन सन्मान दिला जातो. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र अस या पुरस्काराचे स्वरूप असते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी 26 जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा होईल. राजर्षी शाहू पुरस्काराने चित्रतपस्वी व्ही. शांताराम, कविवर्य कुसुमाग्रज, प्रा . एन. डी. पाटील, शरद पवार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, गायिका आशा भोसले, जयमाला शिलेदार, पै. गणपतराव आंदळकर, अण्णा हजारे, तात्याराव लहाने आदी विविध क्षेत्रातील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.


कोण आहे बंग दाम्पत्य?


सन 1986 मध्ये बंग दाम्पत्याने अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर दाम्पत्य जगात कुठेही वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी जाऊ शकले असते, परंतु त्यांनी भारतातील सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली या ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करणे पसंत केले. त्यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (SEARCH) ची स्थापना केली आहे.


वैद्यकीय शिक्षणाच्या दरम्यान विद्यापीठात व भारतात प्रथम स्थान, चार सुवर्णपदके तसेच मानद D.Sc. D.Lit. झालेले आहेत. 'द लॅन्सेट' सारख्या वैश्विक प्रतिष्ठेच्या संशोधन नियतकालिकांसहित विविध प्रतिष्ठित नियतकालिकांत ग्रामीण आरोग्य, बाल आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य अशा विषयांवर ३८ शोधनिबंध प्रसिध्द केले आहेत. तसेच 'माझा साक्षात्कारी हृदयरोग', 'कोवळी पानगळ', 'सेवाग्राम ते शोधग्राम', डॉ. राणी बंग यांची 'गोईण', 'कानोसा' इत्यादी ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.


डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक पुरस्कार देऊन सन्मानीत केले गेले आहे. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारचा 'पदमश्री पुरस्कार' (२०१८), व अन्य दोन राष्ट्रीय पुरस्कार (२००८) साली प्राप्त झाले असून महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण' (२००५), 'भारतीय आरोग्य विज्ञान संशोधन संस्थेचा (ICMR), 'गोईण' पुस्तकाला साहित्य पुरस्कार, व आदिवासीचे सामाजिक आरोग्य या विषयातील संशोधनाकरिता 'आदिवासी सेवक', व मुक्तीपद व्यसनमुक्ती केंद्राला महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अन्य १६ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. 


अभय बंग यांच्या मते, 'ग्रामीण भागात बालक आणि नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यावेळी गडचिरोलीत मोजकेच डॉक्टर होते आणि त्यापैकी कोणीही ग्रामीण भागात सेवा देत नव्हते. त्यामुळे गावातील सुशिक्षित स्त्री-पुरुष हा उत्तम उपाय ठरेल असे आम्हाला वाटले. आम्ही त्याला 'आरोग्य दूत' असे नाव दिले. आम्ही प्रत्येक गावातून एक पुरुष आणि एक स्त्री निवडली आणि त्यांना न्यूमोनिया असल्यास तोंडावाटे अँटीबायोटिक्स देऊन आजारी मुलाची तपासणी, निदान आणि काळजी घेण्याचे प्रशिक्षण दिले. डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग हे उच्च रक्तदाब/स्ट्रोक यांसारख्या असंसर्गजन्य आजारांवरही लक्ष केंद्रित करतात आणि जिल्ह्यातील दारूच्या व्यसनाच्या समस्येवरही काम करत आहेत.