Kolhapur News: राज्यातील शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये (ITI) प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांना 11 जुलैपर्यंत अर्ज भरून कागदपत्रे पडताळणी करता येणार आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी 13 जुलैला तर अंतिम गुणवत्ता यादी 16 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. अंतिम गुणवत्ता प्रसिद्ध झाल्यानंतर संस्था आणि अभ्यासक्रम निवडीच्या पाच फेऱ्या होतील. यानंतर 20 जुलैला पहिली यादी लागेल. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया होणार आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. नियमित तीन, एक व्यवस्थापन आणि एक समुपदेशन अशा एकूण पाच फेऱ्या प्रवेश प्रक्रियेत होणार आहेत.
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज भरता येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, खासगी आयटीआय या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज स्वीकृती केंद्र म्हणून कार्यरत आहेत. खुल्या गटासाठी 150 तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100 रुपये प्रवेश अर्ज शुल्क आहे. प्रवेश अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांची पडताळणी अर्ज स्वीकृती केंद्रात करुन घ्यावी लागतील. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करावा लागेल. विविध संस्था आणि अभ्यासक्रम निवडण्यासाठी पसंतीक्रम भरण्याच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. निवड यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रके आणि संबधित शुल्क भरून प्रवेश निश्चित करावयाचा आहे. चौथ्या फेरीनंतर रिक्त असणाऱ्या जागांसाठी संस्था स्तरावर समुपदेशन फेरी होईल.
असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
- अर्ज नोंदणी 12 जून ते 11 जुलै
- प्रवेश अर्ज निश्चिती 19 जून ते 11 जुलै
- पहिल्या फेरीसाठी विकल्प अर्ज भरणे 19 जून ते 12 जुलै
- प्राथमिक गुणवत्ता यादी एसएमएसद्वारे 13 जुलै
- गुणवत्ता यादी हरकत नोंदी आणि बदल 14 जुलै
- अंतिम गुणवत्ता यादी 16 जुलै
- पहिली फेरी यादी 20 जुलै
- प्रवेश निश्चिती 21 ते 25 जुलै
इतर महत्वाच्या बातम्या