कोल्हापूर : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सध्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त (Shivshakti Parikrama) राज्यभर दौरा करत आहेत. यात्रेनिमित्त त्या आज (7 सप्टेंबर) कोल्हापुरात (Kolhapur) दाखल झाल्या. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी त्यांचं स्वागत केलं. इतकंच नाही तर धैर्यशील माने हे पंकजा मुंडे यांचे सारथी देखील बनले.
पंकजा मुंडे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी त्या करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेणार आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी रवाना होताना धैर्यशील माने यांनी त्यांचे सारथी बनल्याचं पाहायला मिळालं.
पंकजा यांना साताऱ्यात उदयराजेंकडून तलावार भेट दिली
त्याआधी पंकजा मुंडे यांनी काल साताऱ्यातील शिखर शिंगणापूरला भेट देली. यावेळी भाजपचे राज्यसभेचे खसदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं. तसंच पंकजा मुंडे यांना उदयनराजेंनी तलवार भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी स्वतःसह या समाजाचं रक्षण करावं यासाठी मी त्यांना तलवार भेट दिली.
पंकजा मुंडे यांच्याकडून उदयनराजेंची कान पकडून माफी
तत्पूर्वी शिखर शिंगणापूर इथे पोहोचण्यापूर्वी पंकजा मुंडे यांच्या आधी उदयनराजे येऊन थांबले होते. त्यानंतर पंकजा इथे पोहोचल्या. उशीर झाल्यामुळे पंकजा मुंडे यांनी उदयनराजे यांची कान पकडून क्षमा मागितली. तसंच शिखर शिंगणापूर इथे पंकजा मुंडे यांचं फुलांची उधळण करुन स्वागत करण्यात आलं.
राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा
पंकजा मुंडे यांनी 2 महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु केली आहे. पंकजा मुंडे यांची ही शिवशक्ती परिक्रमा यात्रा 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 12 जिल्ह्यातून ही यात्रा जाईल. 5 हजार किलोमीटरची ही पदयात्रा असणार आहे. पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून आज त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर असा प्रवास करत आहेत. त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे. मोठमोठे हार आणि फुलांचा वर्षाव करत पंकजा मुंडे यांचं स्वागत केलं जात आहे.
हेही वाचा
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी उदयनराजे यांची कान पकडून क्षमा मागितली, नेमकं काय घडलं?