Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) शुक्रवारी (17 फेब्रुवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील कागल (Kagal) दौऱ्यावर येत आहेत. अजित पवारांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी तसेच कागलमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती तयारीसाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते. गेल्या महिनाभरापासून आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) ईडीच्या (ED) रडारवर आहेत. दोनदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या दौऱ्यात आमदार हसन मुश्रीफ शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या कागल दौऱ्यामध्ये कागल शहरातील श्रमिक वसाहतीमधील राजमाता जिजाऊ माॅसाहेब या बगीचाचे लोकार्पण, बस स्टॅन्ड परिसरात कागलचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज (बाळ महाराज) पुतळा सुशोभीकरण, निपाणी वेस येथील राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गैबी चौकामध्ये शेतकरी, युवक व महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे.
शिवजयंतीला कागलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
रविवारी शिवजयंतीदिनी निपाणी वेस येथे शिवज्योतीचे आगमन व स्वागत, मुख्य बाजारपेठेतून भव्य मिरवणुकीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुतळ्याला जल- दुग्धाभिषेक, नगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन, गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि इतिहास प्रसारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा सत्कार. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित "शिवाजी कोण होता" या पुस्तकांच्या २५ हजार प्रतींचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप, सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बस स्टॅन्डजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात भव्य- दिव्य असा विद्युत रोषणाईचा स्टॅंडिंग लाईट लेझर शो असे कार्यक्रम होणार आहेत.
ईडीच्या धाडीने हसन मुश्रीफ अडचणीत
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर दोनदा हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पहिल्यांदा त्यांच्या निवासस्थानी छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्यांदा ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यालय, कागल तालुक्यातील सेनापती कापशी तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेत ईडीने छापेमारी केली होती. यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तब्बल 70 तासांनी त्यांची ईडीकडून सुटका झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या