Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) आपले सरकार सेवा केंद्रासाठी जिल्ह्यातील एकूण 276 गावांसाठी जाहीनामा प्रसिध्द करण्यात आला होता. त्यास अनुसरुन प्राप्त अर्जामध्ये अर्जांच्या छाननीमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी दिली आहे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी यापूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्या नावांची व अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्या अर्जदारांची यादी जिल्ह्याच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर 7 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. संबंधित अर्जदार यांनी संकेतस्थळावर भेट देवून आपल्या अर्जामध्ये असणाऱ्या त्रुटी तपासाव्यात आणि त्रुटींची पुर्तता करावी. कागदपत्रांची पुर्तता न करणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही कांबळे यांनी कळविले आहे.
महारक्तदान व महाआरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा
दरम्यान, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अभियाना संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आज ( 9 फेब्रुवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, कोल्हापूर, सर्व उपजिल्हा रुग्णालये, सर्व ग्रामीण रुग्णालये, सर्व स्त्री रुग्णालये, सर्व नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, तरी महारक्तदान शिबिराचे व महाआरोग्य शिबिराचे जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जिल्हातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये सर्व रोग निदान आरोग्य शिबीर, महा रक्तदान शिबीर जागरुक पालक सुदढ बालक अभियान व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' स्थापना करणे बाबत घोषणा या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. या माध्यमातून एक दवाखाना पुढील 3 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात येणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या विविध आरोग्य विषयक अभियानाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हुबेकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उद्याच्या भेटी रद्द
दुसरीकडे, प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या