Kolhapur Market Yard : मजुरीत वाढ, नवीन माथाडी करार करावा, या मागण्यांसाठी काम बंद केलेल्या माथाडींना निलंबित करावे तसेच बाहेरच्या गावातून माथाडी कामगार आणून सौदे सुरू करावेत, अशा सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्यानंतर मार्केट यार्डात (Kolhapur Market Yard) पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले. यात गुळाला 2 ते 4 हजारचा सरासरी भाव मिळाला. माथाडींनी काम बंद केल्याने दोन दिवस शेती उत्पन्न बाजार समिती, सहकार निबंधक व जिल्हाधिकारी यांच्याकडून माथाडी कामगारांनी काम सुरू ठेवून मजुरीवाढीवर चर्चा करावी, अशी सूचना केली होती. माथाडींनी सूचना धुडकावून लावत काम बंदच ठेवले. त्यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेरली माथाडी कामगार बोलावून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मार्केट यार्डात कलम 144 लागू
दरम्यान, माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांच्या जिवीताला व सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याची अथवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा संभव असल्याने प्रतिबंध व्हावा, यासाठी करवीरच्या कार्यकारी दंडाधिकारी शितल मुळे-भामरे यांनी मार्केट यार्डात (Kolhapur Market Yard) कलम 144 लागू केले आहे.
कलम 144 अन्वये गुळ मार्केटमधील विष्णु शंकर रेडेकर, सुभाष बळवंत यादव, प्रकाश गुंगा खाडे, प्रकाश हरी पाटील, सुभाष तानाजी पाटील, युवराज सर्जेराव पाटील, रंगराव मारुती पाटील, मानसिंग गणपती आरंडे, मारुती बंडू पाटील, सुरेश माने, बाबुराव शंकर खोत तसेच संबंधित माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांना 15 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत मार्केट यार्ड कोल्हापूर व त्याच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यात आला आहे.
नुकसानीच्या अनुषंगाने काम चालू ठेवावे असे समितीने सांगूनही त्यांनी विनंती धुडकावून लावली आहे. तसेच जे माथाडी कामगार काम करण्यास तयार आहेत त्यांनाही काम करण्यास प्रतिबंध करीत आहेत. मार्केट यार्डमधील समिती कार्यालयात बैठक घेवून गुळाचे नुकसान होत असल्याने काम चालू करण्याबाबत सांगितले असता संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधीनींनी मान्य न करता बैठकीतून निघून गेले. या माथाडी कामगार संघटनेमुळे बाजार आवारात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती अवलोकनी घेवून गुळाचे नुकसान होवू नये व व्यापारी / अडत दुकानदार व शेतकरी यांचे आर्थिक नुकसान होवू नये व मार्केट मध्ये असंतोष पसरुन गंभीर परिस्थिती निर्माण होवू नये यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या