Kolhapur Crime : माजी सपंच पतीच्या वाढदिनीच माजी सरपंच पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडली. सुप्रिया बाजीराव वाडकर (वय 33. रा. हणबरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. सुप्रिया यांचे वडिल दिलीप शामराव पाटील (वय 59, रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ) यांनी इस्पूर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती बाजीराव वाडकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात वावर असलेल्या घरामध्येच छळाला कंटाळून वयाची पस्तीशीही पार न केलेल्या माजी सरपंच सुप्रिया यांनी आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी आहे.


जाचाला कंटाळून केली आत्महत्या 


दरम्यान, सुप्रिया यांचे वडील दिली पाटील यांनी माहेरकडून पैसे आणण्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयातून शारिरीक आणि मानसिक त्रास देऊन तसेच शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया आणि बाजीराव हे नात्याने पती पत्नी आहेत. पती बाजीरावने 2012 पासून सुप्रिया यांना माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. यासाठी सातत्याने चारित्र्याचा संशय घेऊन मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात होता. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून हणबरवाडीमधील  राहत्या घरी गळ्याला गळफास घेत आत्महत्या केली. 


पतीच्या वाढदिनशीच आत्महत्या 


मिळालेल्या माहितीनुसार बाजीरावचा शनिवारी (1 एप्रिल) वाढदिवस होता. मुले शाळेल्या गेल्यानंतर सुप्रिया यांनी पतीला वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बाजीराव वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी निघून गेले. यावेळी घरी कोणी नसल्याने सुप्रिया यांनी गळफास घेतला. काही महिला घरी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डाॅक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या माहेरी याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर माहेरकडील आम्ही रुग्णालयात पोहोचल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायची नाही अशी भूमिका घेतली. ते आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. वडिल बाजीराव यांनी स्वत:  इस्पूर्ली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


जबरदस्तीने प्रेमसंबंधांसाठी प्रयत्न, तरुणाकडून तरुणीवर कोयत्याने वार


दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच इचलकरंजीमध्ये प्रेमसंबंधास नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर थेट कोयत्याने हल्ल्याने गंभीर जखमी झाली आहे. हल्ला करून हल्लेखोर पसार झाला. तरुणाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुणीच्या हाताची बोटे तुटली आहेत. तरुणीच्या हात, मान आणि डोक्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहेत. त्यामुळे तरुणीला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर तरुणाचा अन्य एका मुलीशी वर्षभरापूर्वी विवाह होऊनही त्याने जबरदस्तीने प्रेमसंबंधासाठी तगादा लावला होता. तरुणीने त्याचे लग्न झाल्याने संबंध तोडले होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु होता. संबंधित तरुणीने त्रासाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. तरीही जबरदस्तीने संबंधांसाठी प्रयत्न करत होता. 


महत्वाच्या इतर बातम्या :