Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांची सासूरवाडी असलेल्या कोल्हापूर (Kolhapur News) दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या जंगी स्वागतासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. याच अनुषंगाने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्वतयारी आढावा बैठक घेत सूचना केल्या. तसेच अमित शहांच्या दौऱ्यात प्रस्तावित असलेल्या भेटीच्या ठिकाणांची सुद्धा पाहणी केली. अवघ्या एक महिन्याच्या आत मोदी सरकारमधील तीन बड्या नेत्यांकडून कोल्हापूर दौरा होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यसाठी जय्यत तयारी सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. यानंतर 28 जानेवारी रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावाही पार पडला. यानंतर आता भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह 19 फेब्रुवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यातही कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.  


अमित शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शाह दोनदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून 18 फेब्रुवारीला ते नागपूर आणि पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. न्यू एज्युकेशन सोसायटी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलसह अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवते. शाह यांच्या पत्नी सोनल शाह सुमारे 40 वर्षांपूर्वी याच शाळेच्या विद्यार्थिनी होत्या. शाह 19 फेब्रुवारीला कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. तसेच नागाळा पार्कमधील पक्ष कार्यालयाच्या परिसरात मंदिराची पायाभरणी करतील. भाजपचे स्थानिक नेते शाह यांच्या भव्य स्वागताच्या तयारीत आहेत. 


देशात पहिल्यांदाच सहकार खात्याचे मंत्री अमित शहाच आहेत. ऊस कारखान्यांना आयकरात सवलत दिल्याने साखर कारखानदार आणि आयकर विभागातील दीर्घकाळ चाललेला वाद सोडवल्याबद्दल तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी संस्थांसाठी अनेक उपाययोजना केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याची योजना आहे.


कोल्हापुरात भाजपला हुलकावणी 


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा बालेकिल्ला समजला जातो. याच भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वाधिक प्राबल्य आहे. त्यामुळे सहकारात बस्तान बसवण्यासाठी भाजपकडून शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर जिल्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो.


त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला असला, तरी आगामी निवडणूक ते भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील हे जवळपास अंतिम आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे असले, तरी ते पुण्यातून आमदार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नसल्याने ती पोकळी भरून काढण्यासाठी सुद्धा पक्षाकडून प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपने मारलेली मुसंडी राजकीय भूवया उंचावणारी होती. या मतदारसंघातून भाजपकडून सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवली होती.  


महाडिक गटाच्या विजयाने भाजपला बळ 


कोल्हापूरमध्ये भाजपची स्थिती तोळामासाचीच आहे. मात्र, धनंजय महाडिकांकडे (Dhananjay Mahadik) राज्यसभेची खासदारकी आल्यानंतर आणि सत्तांतर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पुन्हा मंत्री झाल्याने कार्यकर्त्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिजची पायाभरणी नितीन गडकरींच्या हस्ते करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर दोन्ही खासदार उपस्थित होते. सोबत सांगलीचे खासदार संजयकाका पाटीलही उपस्थित होते. यावेळी संजय मंडलिक ब्रिजवरून खिल्ली उडवल्याचे जाहीरपणे कबूल करताना धनंजय महाडिकांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. 


लोकसभेची लढत कशी असणार? 


कोल्हापुरातून चेतन नरके महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी कार्यक्रम भेटीगाठी सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादीकडूनही चार पाचजण इच्छूक असल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. स्वत: त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा रंगली होती. 


हातकणंगलेत राजू शेट्टी यांची भूमिका स्वतंत्र आहे. तसेच वंचित आणि शिवसेनेची युती झाल्याने या मतदारसंघात परिस्थिती बदलली आहे. वंचितला या मतदारसंघात मिळालेली मते भूवया उंचावणारी होती. वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविताना त्यांनी जोरदार टक्कर देत सव्वा लाखांवर मते मिळवली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या