jyotiraditya Shinde In kolhapur : केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. यावेळी लोकप्रतिनिधी यांनी अमृत योजना, थेट पाणीपुरवठा योजना, पीएम किसान योजना, पीएम स्व निधी योजना, मातृ वंदना योजना या केंद्रीय योजनांबरोबरच पंचगंगा शुद्धीकरण या अनुषंगाने सूचना मांडल्या. यावेळी विविध विभागाने केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणी बाबत तसेच सद्यस्थिती बाबत पीपीटीद्वारे सादरीकरण केले.


शिंदे पुढे म्हणाले की, कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास समांतरपणे झाला पाहिजे. विकासकामांची अंमलबजावणीची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी व ड्रेनेजसाठी स्वतंत्रपणे रस्ते न खोदता दोन्ही कामासाठी एकाच वेळी रस्तेखुदाई करुन काम पूर्ण होणे गरजेचे होते. रस्तेखुदाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात तर त्या अडचणी निर्माण होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. 


अमृत योजनेअंतर्गतच्या पहिल्या टप्प्यात 113 किलोमीटर पाईपलाईन पैकी 65 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तरी संबंधित ठेकेदारांकडून उर्वरित पन्नास किलोमीटरचे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करून घ्यावे. तसेच कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा योजनेच्या काम करणाऱ्या ठेकेदारांकडून वारंवार मुदतवाढ देऊ नये. अंतिम मुदत देऊन हे काम पूर्ण करून घेण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.


प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण अंतर्गत एकही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आहे. घरकुलाची अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करा. घरकुलाचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाने त्यांना प्रोत्साहित करावे, अशी सूचनाही शिंदे यांनी केली. 


अमृत योजना टप्पा एक व टप्पा दोन, लाभार्थी विकास कार्यक्रम, अमृत सरोवर योजना, पंचगंगा शुद्धीकरण योजना, कोल्हापूर जिल्ह्याची महत्वाची वैशिष्ट्ये जसे कोल्हापुरी चप्पल, गूळ उत्पादन, चांदीचे दागिने तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन विकास या बाबींना पुढील काळात अधिक प्राधान्य देऊन कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.


यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार अमल महाडिक, समरजीत घाटगे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या