कोल्हापूर : गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूर महापालिकेचे (Kolhapur Municipal Corporation) आयुक्तपद रिक्त आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar) प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूरला पूर्णवेळ आयुक्त मिळावा अशी मागणी आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) लावून धरली आहे. मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कोल्हापूरला एक चांगला आयुक्त देऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना दिले होते. या पार्श्वभूमीवर आप युवा आघाडीच्या वतीने पोस्टर कॅम्पेन राबवत "दादा, मुंबईला पोचलासा काय? पोचला असला तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या" अशा आशयचे पोस्टर धरुन शहरातील छत्रपती शिवाजी चौक, दसरा यासारख्या विविध चौकात नागरिकांचे लक्ष वेधले.


"शासन आपल्या दारी, पण आयुक्त नाही कोल्हापूर नगरी", "सरकार एका रात्रीत बनतंय, मग आयुक्त द्यायला 3 महिने का" असे पोस्टर झळकवत महानगरपालिकेला आयुक्त मिळावा यासाठी आप युवा आघाडीने हे पोस्टर कॅम्पेन राबवले असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले. यावेळी शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी, दिग्विजय चिले, अमरसिंह दळवी, संजय नलवडे आदी उपस्थित होते.


कोल्हापूरकर पूर्णवेळ महापालिका आयुक्तांच्या प्रतीक्षेत


कोल्हापूर महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त (प्रशासक) कादंबरी बलकवडे यांची मे 2023 मध्ये आयुक्तपदावरुन इतरत्र बदली झाली. तेव्हापासून जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणून प्रभारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोल्हापूर महापालिकेला आयुक्त नसल्याने कलेक्टर यांच्यावर कामाचा ताण येत आहे. शिवाय तर शहराचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकर पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार याची प्रतीक्षा करत आहेत.


अजित पवार काय म्हणाले होते?


कोल्हापुरात 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतरच्या भाषणात महापालिकेला लवकरच आयुक्त मिळेल, असं आश्वासन दिले होते. अजित पवार म्हणाले होते की, "सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने काही दिवस द्या. मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढच्या काहीच दिवसात महापालिकेला एक चांगला आयुक्त देऊ." 


मागील आठवड्यात आपचं गाऱ्हाणे घालून आंदोलन


अजित पवार यांच्या या घोषणेमुळे कोल्हापूर महानगरपालिकेला लवकरच पूर्णवेळ आयुक्त मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु अजूनही कोणत्याही हालचाली दिसत नसल्यामुळे आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीच्या वतीने कोल्हापुरात पोस्टर कॅम्पेन राबवण्यात आले.


दरम्यान मागील आठवड्यात शनिवारी (12 ऑगस्ट) देखील आम आमदी पक्षाने आंदोलन केलं होतं. कोल्हापूर महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावे यासाठी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले होते. "नवीन आयुक्त आपल्या मर्जीतला असावा यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. परिणामी निर्णय प्रलंबित पडत आहे. महापालिकेला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. नागरी सुविधाचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आपने श्री महालक्ष्मी देवीसमोर गाऱ्हाणे मांडून आंदोलन केले.


हेही वाचा


Ajit Pawar: बेवारस कोल्हापूरला आयुक्त मिळणार तरी कधी? हद्दवाढ, काळम्मावाडी धरण गळतीचे काय? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...