Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने तसेच सहकार्याने राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पुरूष व महिला कुस्तीपटूंसाठी राज्यस्तरीय राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन जूनपासून खासबाग मैदानात कुस्तीचा थरार रंगणार आहे. पुरूषांच्या खुल्या गटातील (86 किलोवर) विजेत्याला एक लाखाचे तर महिलांच्या खुल्या गटातील (60 किलोवर) विजेत्यास 50 हजारांचे बक्षीस आहे. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात ही स्पर्धा होणार आहे.
विजयी मल्लांना 5 लाख 71 हजारांवर रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र
पुरूष गटात आठ व महिला गटात वजन गटात स्पर्धा होणार आहेत. पुरूष खुला गट राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धा व महिला गटात राजर्षी शाहू महिला केसरी स्पर्धा होणार आहे. विजयी मल्लांना 5 लाख 71 हजारांवर रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. चार जूनला खुल्या गटात मैदानी काटा जोड कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे व राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता शैलेश शेळके यांच्यात निकाली कुस्ती होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
कुस्तीपटूंवर बक्षिसांचा वर्षाव
पुरूषांच्या 57 किलो गटासाठी प्रथम बक्षीस 7 हजार, 61 किलोसाठी 10 हजार, 65 किलोसाठी साडेबारा हजार, 70 किलो व 74 किलोसाठी 15 हजार, 79 किलोसाठी 20 हजार, 86 किलोसाठी २५ हजार बक्षीस आहे. महिला गटातील 55 किलोसाठी 10 हजार, 60 किलोसाठी 15 हजारांचे बक्षीस आहे. पुरूष गटासाठी एकूण 4 लाख 36 हजारांची तर महिला गटासाठी एक लाख 35 हजारांची बक्षीसे आहेत.
महिला गटात दोन वजन गट वाढवले
महिला गटामध्ये 36 किलो वजनगट, 40 किलो वजनगट व 45 किलो वजन गटामध्ये काही स्पर्धक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास उत्सुक असलेने या वजन गटांचाही समावेश करण्यात आला आहे. 36 ते 45 वजन गटाचा प्रथमच समावेश करण्यात आल्याने जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. स्पर्धेबाबतची माहिती तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे, सचिव अशोक पोवार, माजी महापौर आर. के. पोवार, विनोद चौगुले, विष्णू जोशीलकर, अंजली जाधव, नामदेव मोळे तसेच उपायुक्त रविकांत आडसूळ, इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या