Kolhapur News: जन्माला येण्यापूर्वीच पोटातच कळी तोडण्याची विकृत वृत्ती वाढीस लागलेली असतानाच कोल्हापूरात (Kolhapur News) याला छेद देणारी घटना घडली. पोटाला लेक आल्यानंतर अत्यानंद  झालेल्या बापाने आपल्या लेकीचे स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढून केले. ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात लेकीची हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आल्याने पंचक्रोशीत कुतूहलाचा विषय झाला. विशेष म्हणजे मिरवणुकीतून सामाजिक संदेश देण्यात आला. मुलीचे नाव ईरा असे ठेवण्यात आलं आहे. 


मिरवणुकीतून 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा सामाजिक संदेश


शिवाय स्वागतासाठी ढोल ताशा आणि मर्दानी खेळ खेळाचे देखील आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाचगावमध्ये गिरीश आणि मनीषा पाटील यांना पाच महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले. मुलगी झाल्यानंतर अनेक जण नाक मुरडत असतात. मात्र, गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाडक्या कन्येचं स्वागत अगदी धुमधडाक्यात करण्याचे नियोजन केले. मिरवणुकीतून 'बेटी बचाओ बेटी पढाओ'चा सामाजिक संदेश देण्यात आला. 



पाचगावमधील ओम पार्क (शांतीनगर) ते ढेरे मल्टीपर्पज हॉल, पाचगाव अशी 900 मीटर मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. लेकीचे स्वागत करण्यासाठी चक्क हत्तीवरून आणि रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषेत नटवण्यात आले होते. तसेच त्यांच्या हातात सामाजिक संदेश देणारे फलक देण्यात आले होते. मुलींच्या जन्माबाबत असलेल्या चुकीच्या समजुती दूर व्हाव्यात हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. 


इतर महत्वाच्या बातम्या