Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर (Kolhapur News) महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये उद्यापासून 'जागरुक पालक सुदृढ बालक' अभियान सुरु होत आहे. या सदंर्भात महापालिकास्तरीय कृती दल समितीची बैठक पार पडली. या अभियानांतर्गत शहरातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील 127563 इतक्या बालक युवक, युवती यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन आवश्यकतेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित केलं जाणार आहे.


प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी ही मोहिम नियोजनपूर्वक राबवून तपासणी करण्यात येणाऱ्या बालकाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. या मोहिमेअंतर्गत बालकांची तपासणी शासकीय निमशासकीय शाळा, कनिष्ठ विद्यालय, खासगी शाळा, अंध दिव्याग शाळा, अंगणवाडी, खाजगी बालवाडी, बालसुधारगृह व अनाथ आश्रम या ठिकाणी करण्यात येणार आहे. 


या अभियानांमध्ये गरजू आजार बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरविणे तसेच सुरक्षित सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाचा शुभारंभ (Kolhapur Municipal Corporation) ताराबाई पार्क येथील न्यू मॉडल इंग्लिश स्कूल व मंगळवार पेठ येथील प्रायव्हेट हायस्कूल या ठिकाणी होणार आहे. या अभियानांतर्गत शाळेतील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येणार असून पुढील 8 आठवडयामध्येही मोहिम शहरातील सर्व अंगणवाडी, शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळामध्ये राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सावित्रीबाई  फुले, पंचगंगा हॉस्पिटल व 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 


या आरोग्य शिबीराच्या ठिकाणी सर्व वयोगटातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व नागरीकांनी व तरुण मंडळांनी या आरोग्य व रक्तदान शिबीरामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. याचबरोबर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेची घोषणेसाठी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या