कोल्हापूर: विशाळगड परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या कारवाईमुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे. एकीकडे या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजपसह संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर (Vishalgad fort) हिंसाचार झाल्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी जिल्हा प्रशासनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. थोड्याच वेळात शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. आज शाहू महाराज विशाळगडावर आणि पायथ्याला झालेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहेत. शाहू महाराज यांच्यासोबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे नेते  असतील. 


विशाळगडावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीने विशाळगडावर ज्या ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांना मदत घेऊन जाणार आहोत. सरकार कधी मदत करेल काही माहित नाही, मात्र सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही मदत घेऊन जाणार आहोत असं आमदार सतेज पाटील यांनी कालच म्हटले होते. तसेच विशाळगडावर पुण्यातील काही लोक येऊन त्यांनी हा हिंसाचार केल्याचा आरोपही सतेज पाटलांनी केला होता. पुण्यातले लोक कोल्हापुरात येतात काय आणि ही दंगल होते काय अशा प्रकार घडत असताना पोलिस अधीक्षकांनी बघ्याची भूमिका घेतली. ज्या दिवसापासून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित या जिल्ह्यात आले आहेत तेव्हापासून कोल्हापुरात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे त्यांना शासनाने परत बोलवावं, तरच या घटना थांबतील, अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली होती.


शाहू महाराजांकडून विशाळगडावरील घटनेचा निषेध


विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार प्रचंड वेदनादायी असू आम्ही त्याचा निषेध करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना होते हे अत्यंत क्लेशदायक आहे. यासंदर्भात प्रशासनाने माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांना घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु ते गांभीर्याने घेण्यात आलं नाही. त्यानंतर ही घटना घडली, हे प्रशासनाचे अपयश आहे, असे शाहू महाराजांनी म्हटले होते.


हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले त्याना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केलं नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल, असेही शाहू महाराजांनी स्पष्ट केले होते.


विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक


विशाळगडाच्या परिसरात झालेल्या कारवाईविरोधात आता एमआयएम पक्ष आक्रमक झाला आहे. 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमकडून मोर्चा काढला जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 19 जुलैला कोल्हापूरात धडकणार आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून फेसबुकवरून कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 


विशाळगड प्रकरणात काँग्रेसची उडी


कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस आमदार अस्लम शेख व अमिन पटेल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची आज दुपारी 12 वाजता भेट घेणार आहेत.


आणखी वाचा


संभाजीराजेंनी भूमिका घेताना जरा विचार करायला हवा होता; विशाळगड घटनेवर सतेज पाटील पहिल्यांदाच बोलले