कोल्हापूर: संभाजीराजे यांच्या विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेला यश आलं असून पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मंगळवारी पुन्हा अतिक्रमण हवटण्याचं काम सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली असून 400 पेक्षा अधिक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी संभाजीराजे यांनी आंदोलन छेडलं होतं. 


किल्ले विशाळगडावरील विविध प्रयोजनाकरिता केलेली अतिक्रमणे काढणे बाबत, प्रलंबित असलेल्या न्यायालयीन प्रकरणांबाबत शासकीय महाभियोक्ता, मुंबई उच्च न्यायालय यांचे अभिप्राय मागविणेत आले होते. ते अभिप्राय 15 जुलै 2024 रोजी प्राप्त झाले असून त्यामध्ये उच्च न्यायालयात व इतर न्यायालयात ज्या याचिकाकर्त्यांना स्थगनादेश आहे, ती वगळून इतर अतिक्रमणे काढता येतील असे नमूद केले आहे. बंधित अभिप्राय मिळताच प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिम काढणेस प्रारंभ केला.


प्रशासनाचा मोठा फौजफाटा तैनात 


मोहिमेच्या पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढणेत आली. यामध्ये व्यावसायिक कारणांकरिता असलेली व स्थगनादेश नसलेली अतिक्रमणे काढणेत आली. सदर मोहिमेमध्ये महसूल विभागाचे 90 कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागासह त्यांनी 150 मजूर उपलब्ध केले तसेच पुरातत्व, महावितरण, ग्रामपंचायत व वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी भाग घेतला. पोलीस विभागाचे 250 अधिकारी कर्मचारी घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी उपस्थित होते.


या मोहिमेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी पन्हाळा-शाहूवाडी समीर शिंगटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी आप्पासाहेब पवार, तहसिलदार शाहूवाडी रामलिंग चव्हाण, सहा. संचालक पुरातत्व विभाग विलास वहाणे, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग चंद्रकांत आयरेकर, उपअभियंता सा.बां विभाग धनंजय भोसले, गट विकास अधिकारी शाहूवाडी मंगेश कुचेवार यांनी आपला सहभाग नोंदविला. या मोहिमेदरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.


गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक


विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता. मात्र संभाजीराजे गडावर पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला. त्या हिंसाचारामध्ये वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली होती.


ही बातमी वाचा: